सलामीसाठी साई सुदर्शन पुन्हा फिट
पहिली अनधिकृत कसोटी आजपासून
वृत्तसंस्था, पुडुचेरी
सध्या ऑस्ट्रेलियाचा पुरुष अ क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. येथे मंगळवारपासून भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीला प्रारंभ होत आहे. या सामन्यात साई सुदर्शन पुन्हा सलामीला खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघात अनेक कसोटी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. भारतीय संघ येत्या काही दिवसांमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार आहेत. त्यामुळे आतापासूनच या दौऱ्यासाठी कसोटी संघात योग्य खेळाडूंची निवड करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया अ संघात सॅम कोन्स्टास, नाथन मॅक्स्वेनी, टॉड मर्फी आणि जाय रिचर्डसन यांचा समावेश करण्यात आला आहे.
साई सुदर्शनने आतापर्यंत 7 कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये भारत अ संघाकडून खेळताना पहिल्या दोन प्रथम श्रेणी सामन्यात साई सुदर्शनने अनुक्रमे 132 आणि 168 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर साई सुदर्शनच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले होते. भारत अ संघाचे नेतृत्व देवदत्त पडिक्कलकडे सोपविण्यात आले आहे. साई सुदर्शन उपकर्णधार म्हणून राहिल. लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत देवदत्त पडिक्कलने दोन शतके झळकाविली होती. भारतीय कसोटी संघामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. येत्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर चषकासाठी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने आतापासूनच दर्जेदार फिरकी गोलंदाज आणि सलामीच्या फलंदाजाचा शोध घेण्याचे ठरविले आहे. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज सारांश जैनने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळताना विशेष प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे निवड समितीचे हंगामी अध्यक्ष प्रज्ञान ओझा व त्यांचे सहकारी तनुष कोटीयानच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतील. भारत अ संघ या वर्षांत दुसऱ्यांदा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळविले जातील.