For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये अजूनही स्पेस, 18 वाघ व्यवस्थित राहू शकतील इतकी क्षमता

03:53 PM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
sahyadri tiger reserve  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये अजूनही स्पेस  18 वाघ व्यवस्थित राहू शकतील इतकी क्षमता
Advertisement

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ आल्याने त्यांची संख्या ८ होईल

Advertisement

By : संतोष पाटील

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ येत आहेत. वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अभ्यासानुसार सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पामध्ये सध्या १८ वाघ व्यवस्थित राहू शकतील इतकी स्पेस आहे. या प्रकल्पात आतापर्यंत कोयना प्रकल्पात १ आणि आणि चांदोली परिसरात २ असे ३ वाघ ट्रॅप झाले आहेत.

Advertisement

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाच वाघ आल्याने त्यांची संख्या ८ होईल. अजून १० वाघ प्रकल्पात सहज राहू शकतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक स्थलांतर करुन वाघ येतो, परंतु येथे स्थिरावत नसल्याचा अनुभव आहे. तीन वर्षापूर्वी येथे ५० चितळ सोडण्यात आली होती. चितळांची संख्या वाढेल, असे नियोजन वन विभागाने केले. जेणेकरुन वाघांचे नैसर्गिक खाद्य तयार होईल.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ आल्यानंतर येथील गवा आणि हत्तीपासून होणारा मानवी वस्तीतील त्रासही कमी होण्यास मदत होणार आहे. गवा हे वाघाचे नैसर्गिक आणि आवडते खाद्य असल्याने गव्यांची संख्या मर्यादीत राहण्यासही मदत होणार आहे. हत्तीचा वावरही दाट जंगलात राहील. वाघाच्या धास्तीने त्यांचे विरळ भागात येण्याचे प्रमाण कमी होईल.

प्रकल्पात उरलेल्या गावांचे पुनर्वसन करून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. सह्याद्रीच्या जंगलात हक्काचे ८ वाघ आल्याने जिल्ह्याचे पर्यटन तसेच नैसर्गिक समृध्दता वाढण्यास हातभार लागणार आहे. कोयना, चांदोलीपासून राधानगरी अभयारण्यापर्यंत पश्चिम घाट माध्यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे.

चांदोली-कोयना अभयारण्य १,१५६ हेक्टर तर राधानगरी अभयारण्य ४३१ हेक्टर आहे. अभ्यासानुसार तिलारी हा भाग वाघांच्या अधिवासासाठी उत्तम नैसर्गिक ठिकाण मानला जातो. या ठिकाणी जन्मलेली आणि नंतर मोठी झालेली वाघांची पिल्ले गोवा, कर्नाटक आणि सह्याद्री व्याघ्र राखीव भागात प्रस्थापित होतात.

अवैध वृक्षतोड तसेच शाहूवाडी तालुक्यातील खाणी विकास प्रकल्प आणि वनक्षेत्र लगत कोकणात शेतीमध्ये रबर आणि अननस या व्यापारी तत्त्वावर लागवड हे वाघांच्या अधिवास व स्थलांतर मार्गावर अडथळे बनत आहेत. आठ वाघ येणार असल्याने नैसर्गिक अधिवासातील कृत्रिम अडथळे दूर करण्याची गरज आहे.

सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये बिबट्या आणि जंगली कुत्र्यांची वाढणारी संख्या वाघांना खाद्य मिळवण्याच्या शर्यतीतील एक अडथळा आहे. त्यासाठी सागरेश्वर अभयारण्य व कात्रज येथील सांबर आणि चितळ सोर्स पॉप्युलेशन म्हणून वापर करण्याचा विचार आहे. विपुल प्रमाणात जैवविविधता असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे भविष्यातील वाघांचे भवितव्य म्हणून पाहता येईल.

कोल्हापूर नैसर्गिकदृष्ट्या संपन्न वाघांचे अस्तित्व असेल तर त्या परिसरात जंगलतोड होत नसल्याचे आकडेवारी दर्शवते. वृक्ष संवर्धन झाल्याने पशुपक्ष्यांची पैदास मोठ्या संख्येने होते. पाऊस चांगला पडतो. जमिनीची धूप थांबते. वाघांचा अधिवास असल्याने कोल्हापूर हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न मानले जाते. सह्याद्री प्रकल्पात वाघांचे दर्शन हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात मैलाचा दगड ठरु शकतो. यादृष्टीने राज्य सरकारने नियोजन करण्याची गरज आहे.

वाट प्रशस्त करावी लागेल!

कोयना ते राधानगरी आणि खाली दक्षिणेत तिलारीपर्यंत पश्चिम घाट माथा हा वाघांचा परिक्रम मार्ग आहे. कर्नाटकात पश्चिम घाटमाथ्याची रुंदी काही ठिकाणी १०० किलोमीटर इतकी आहे. मात्र सह्याद्री घाटमाथ्यावर ही वाट
चिंचोळी असून काही ठिकाणी फक्त ५ ते १० किलोमीटर आहे.

वाघ प्रवास करताना चिंचोळा मार्ग अडचणीचा ठरत असल्याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष आहे. जंगलाच्या सानिध्यात असणाऱ्या चार गावांचे पुनर्वसन करुन वाघांचा भ्रमण मार्ग आणि अधिवास अधिक सक्षम करण्यावर वन विभागास काम करावे लागेल.

पर्यटन वाढीस मिळणार चालना

विदर्भातील रखरखत्या उन्हात निव्वळ वाघ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अन्नसाखळीत सर्वोच्च स्थान असलेल्या वाघाची इंडियन इन्स्टिट्यूट ऑ फ फॉरेस्ट मॅनेजमेंट संस्थेने अभ्यासांती पर्यावरणीयदृष्ट्या किंमत तब्बल १८ कोटी रुपये केली आहे. यावरुन वाघांचे पर्यावरणीय महत्व अधोरेखित होते.

Advertisement
Tags :

.