Sangli Crime : सह्याद्रीनगरात परप्रांतीय गुंडाचा किरकोळ वादातून खून, टोळीकडून हल्ला
भर दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली
सांगली : सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजारमध्ये रेकॉर्डवरील गुंडावर धारदार हत्याराने हला करून दगडाने ठेचण्यात आले. डोक्यावर वर्मी घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुबारक उर्फ पुलवा हसीउल्ला सहा (वय 37, रा. प्रकाशनगर, कुपवाड) असे त्याचे नाव आहे.
भर दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, किरकोळ वादातून हा हला झाल्याचे प्राथामिक तपासात पुढे आले आहे. सहा ते नऊ जणांच्या टोळक्याने हा हला केल्याचे पालिसांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुबारक सहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो प्रकाशनगर पारिसरात राहण्यास असून भंगार व्यावसायिक आहे.
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तो सह्याद्रीनगर येथील हॉटेल रत्नामध्ये आला होता. त्याच्यासोबत मात्र अजऊद्दीन इनामदार होता. दुपारी साडेचारच्या सुमारास ते दोघे सह्याद्रीनगर येथील सुरक्षा थांब्याजवळ आले. संशयितही त्याठिकाणी आले. संशायित आणि मुबारक यांच्यात किरकोळ वाद झाला.
त्या वादातून एका संशायिताने एडक्यासारख्या धारधार हत्याराने हल्ला केला. आरडाओरडा करत मुबारक तेथून रेल्वे स्टेशनच्या बाजूला पळत सुटला. एका प्रार्थनास्थळासमोर दुचाकीवरून गाठत संशयितांनी त्याला दगडाने ठेचले. दगडाचा घाव इतका वर्मी होता की रक्ताच्या थारोळ्यात मुबारक पडला.
संशयितांनी दुचाकीवरून पळ काढला. दरम्यान, भागातील नागरिकांनीच 108 रूग्णवाहिकेस बोलावले. परंतु मुबारकच्या डोक्यात गंभीर घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पालिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने घटनास्थळी पंचनामा केला. मृत मुबारकच्या भावाची फिर्याद नोंदवून घेतली. संशयिताच्या शोधासाठी एलसीबीसह स्थानिक पोलीसांची पथके रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मारेकरी सीसीटीव्हीत कैद
मृत मुबारक यास मारहाण करतानाचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी मारल्याचे स्पष्ट झाले. परंतु आणखी काही जणांचा यामध्ये समावेश असू शकतो असे पोलिसांनी सांगितले.
मुबारकरेकॉर्डवरील गुन्हेगार
मृत मुबारक हा एका रेकॉर्डवरील गुन्हेगार असून कुख्यात गुंडाच्या टोळीत त्याचा सहभाग होता. हाच काटा काढण्यासाठी दुसऱ्या गुंडाच्या टोळीने हल्ला केल्याची चर्चा परिसरात होती. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.