Sangli : तासगावच्या सह्याद्री कदम हिचा देशात डंका
सह्याद्री कदमने महाराष्ट्राचे नाव उज्वल केले
सांगली : बीसीसीआयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करत गुजरात संघाचा सात गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या विजयाची शिल्पकार ठरली कर्णधार सह्याद्री अभिजीत कदम. तिने ४८ धावांची संयमी व नेतृत्वपूर्ण खेळी साकारत संघाला दणदणीत यश मिळवून दिला.
सह्याद्री कदम ही मूळची बांबवडे (ता. तासगाव) येथील असून सध्या ती तासगाव येथे वास्तव्यास आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून क्रिकेटची आवड जोपासत तिने सांगली येथे दररोज प्रवास करून सातत्याने सराव केला. कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर तिने हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला असून आज तिच्या संघर्षाचे चीज झाले आहे. सध्या ती महाराष्ट्राची कर्णधार म्हणून खेळत आहे.
१९ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट नेतृत्वगुणाचे दर्शन सह्याद्रीने घडवले. तिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या महिला संघाने या स्पर्धेत एकही सामना न हरता सर्व सामने जिंकत थेट अंतिम फेरी गाठली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजेमहाराष्ट्राच्या इतिहासात महिला संघाने प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान पटकावला आहे.
या यशाबद्दल सह्याद्री कदम हिच्यावर केवळ तासगाव तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या ऐतिहासिक विजयाचे श्रेय सह्याद्रीने आपल्या आई-वडिलांना दिले असून, तिच्या क्रिकेट प्रवासात मोलाचे मार्गदर्शन करणारे स्मृती मानधना यांचे वडील श्रीनिवास मानधना, क्रिकेट अकॅडमीचे अक्षय पाटील, आनंद तांबेकर तसेच सांगली क्रिकेट असोसिएशनचे संजय बजाज यांचेही तिने आभार मानले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, सह्याद्री अभिजीत कदम ही तासगावचे माजी नगराध्यक्ष दिनकर धाबुगडे यांची नात आहे. तिच्या या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.