इम्रान मसूद यांना काँग्रेसकडुन सहारनपूरची उमेदवारी
पक्षाने बी फॉर्म सोपविला
वृत्तसंस्था/ सहारनपूर
काँग्रेसने अखेर सहारनपूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार इम्रान मसूद यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसने मसूद यांना उमेदवारी देत तेथील लढतीला चुरशीचे स्वरुप दिले आहे. मसूद हे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी इम्रान यांना उमेदवारी देण्यात आल्याची पुष्टी दिली आहे. काँग्रेस उमेदवारांच्या नावांची आणखी एक यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे.
सहारनपूरमधील मातब्बर नेते असणारे मसूद हे यापूर्वी अनेक पक्षांमधून काँग्रेसमध्ये परतले आहेत. इम्रान मसूद यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. त्याचवेळी मसूद यांची उमेदवारी निश्चित असल्याचा कयास वर्तविला जात होता. तसेही इम्रान मसूद यांच्याव्यतिरिक्त सहारनपूर मतदारसंघात काँग्रेसकडे अन्य कुठलाच मजबूत दावेदार नाही. अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाकडून जारी होणारा बी फॉर्म सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झाला आहे.
इम्रान मसूद हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सहारनपूर मतदारसंघात उमेदवार होते. दोन्हीवेळा ते पराभूत झाले होते. 2014 मध्ये त्यांना भाजपचे उमेदवार राघव लखनपाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर 2019 मध्ये बसपचे हाजी फजर्लुरहमान यांच्याकडून ते पराभूत झाले होते. यापूर्वी त्यांनी बसपमध्ये प्रवेश केला होता. पण 6 महिन्यांपूर्वी बसपने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.