9 ऑक्टोबरला येतोय ‘सहल’
देविका दफ्तरदार मुख्य भूमिकेत
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री देविका दफ्तरदार महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सहल’ या आगामी मराठी चित्रपटात तिची भावस्पर्शी भूमिका पहायला मिळणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी ‘सहल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
के. स्वामिनी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर आहेत. मूळ पटकथा मुकुंद खुपेरकर यांनी लिहिली आहे. ‘सहल’मध्ये देविका दफ्तदार यांच्यासोबत सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसूण्, आदित्य खुपेरकर आणि सागर कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सिद्धेश या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य नायक म्हणून पदार्पण करणार आहे. यापूर्वी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एक भूमिका साकारली होती. सहल चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यांनी केले असून संकलनाची जबाबदारी चंद्रशेखर गुरव यांनी सांभाळली आहे. सुहास मुंढे, समीर पठाण यांनी लिहिलेल्या गीतांना डॉ. जय भीम शिंदे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे.
देविका यांनी अनेक चित्रपटांतून अत्यंत संवेदनशील भूमिका साकारून त्यांच्यातील सक्षम अभिनेत्रीचे दर्शन घडविले आहेत. आता सहल चित्रपटातील भूमिकेतून त्या नेमके कोणते भावविश्व उभे करतात आणि चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांशी त्यांचे नाते कसे उलगडत जाते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
