ता. पं., जि. पं.वर भगवा फडकवणार
निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे तालुका म. ए. समितीचे आवाहन, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
आगामी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच मतदारसंघनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा ध्वज फडकवणारच, असा निर्धार करून तालुका म. ए. समितीने कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना केल्या आहेत.
रविवारी मराठा मंदिर येथे झालेल्या तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निवडणुकांविषयी सखोल चर्चा करण्यात आली. निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्याने आता तारखांची वाट न पाहता म. ए. समितीने गावोगावी तयारी करावी आणि अधिकाधिक सक्षम उमेदवारांची चाचपणी करून त्यांना निवडून आणावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
निवडणुका हा लढ्याचा एक भाग
म. ए. समितीचे अंतिम ध्येय महाराष्ट्रात जाण्याचे असले तरी निवडणुका हा या लढ्याचा एक भाग आहे. निवडणुकांमधून लोकेच्छा व्यक्त केली जात असते. मागील काही निवडणुकांमध्ये म. ए. समिती पिछाडीवर पडली असली तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मागील काही निवडणुकांचा अनुभव घेता कुठेही बंडखोरी होणार नाही, याची खबरदारीही घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
काही वर्षांपूर्वी झालेल्या मतदारसंघांच्या रचनेमुळे यापूर्वीच म. ए. समितीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता निवडणुकांची तारीख न पाहता सक्षम उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. निवड कमिटीची स्थापना करून उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बोध घ्या
अंतर्गत दुहीमुळे म. ए. समितीचे आजवर अनेकवेळा नुकसान झाले आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या बेळगाव महानगरपालिकेमध्ये एका एका वॉर्डमध्ये चार ते पाच मराठी भाषिक उभे राहिले. यामुळे मतविभागणी होऊन राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून आले. एकूण मतांची टक्केवारी पाहता म. ए. समितीला सर्वाधिक मते असली तरी केवळ तीन नगरसेवक निवडून आले. त्यामुळे याचा बोध घेऊन किमान आगामी जि. पं. व ता. पं. निवडणुकांमध्ये एकच एक उमेदवार राहील, यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
