पूर्व भागात दौडमुळे भगवेमय वातावरण
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गुऊवारी दुर्गामाता दौडला भगवेमय वातावरणात उत्साहात प्रारंभ केला. गावोगावी काढलेल्या दौडमध्ये देव, देश व धर्माचे रक्षण करण्याचा निर्धार करत हजारो युवक व युवती सहभागी झाले होते. विविध देवदेवतांच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मोदगा, मारिहाळ, सुळेभावी गावांमध्ये दौडला उत्साहात प्रारंभ केला. पंत बाळेकुंद्री येथे पहिल्यांदाच दुर्गामाता दौड काढली. सांबरा येथे पहिल्या दिवशी दोन हजारहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. प्रारंभी शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ शिवमूर्तीचे पूजन देवस्थान कमिटी व इतरांच्या हस्ते केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे नित्य पूजन झाल्यानंतर प्रेरणा मंत्राने दौडला प्रारंभ केला. गावातून दुर्गामाता दौड काढली. दौडीचे आरती ओवाळून व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत होते. दौड मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. दौड क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा पुतळ्याजवळील मातंगी मंदिर येथे ध्येय मंत्राने सांगता केली .
पंत बाळेकुंद्री येथे पहिल्यांदाच दुर्गामाता दौडीचे आयोजन
पंत बाळेकुंद्री येथे पहिल्यांदाच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ केला. आंबेडकर गल्ली येथील श्री दुर्गादेवी मंदिरमध्ये प्रेरणा मंत्र म्हणून दौडला प्रारंभ केला. दौड आनंदनगर, पंतनगरमार्गे श्रीपंत महाराज मंदिरात आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडची सांगता करण्यात आली. दौडमध्ये सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मोदगा येथील कार्यकर्तेही सहभागी झाले होते. पहिल्याच दिवशी दौडमध्ये सुमारे चारशे कार्यकर्त्यांचा सहभाग होता.