केशर काजळ ज्याचे त्याचे....
संदीप सलील जोडीचं एक सुरेख गाणं म्हणजे
आता माझा रंग झाला जळागत
केशर काजळ ज्याचे त्याचे
डोकावता कोणी पाहते स्वरूप
सुरूप कुरूप ज्याचे त्याचे
आणायला स्वत:चा असा रंग नसतो. जो रंग पाण्यात मिसळावा पाणी त्याच रंगाचं होतं. प्रत्येक माणसाची विचारशक्ती किंवा विचारपद्धती ही वेगळी असते. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणतात ते काय उगीच? प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. कुवत वेगळी असते. श्रद्धा वेगळ्या असतात व म्हणूनच प्रत्येकाला भेटणारा देवही वेगळा असतो. कुणाला रोज सकाळी उठून ताजी फुलं, सुगंधी चंदन, हळद कुंकू, तांब्याची उपकरणे यासह अतिशय लख्ख व नेटकी देवपूजा करायला आवडते. त्याच्या लेखी देव म्हणजे बाहेरून येणारे कुणीही नसतात तर त्याच्या देव्हाऱ्यातच त्याच्या कुटुंबावर लक्ष ठेवून राहणारे कोणीतरी असतात. त्याच्या सुखदु:खाच्या प्रत्येक क्षणी तो त्याच देवाच्या समोर जाऊन बसतो. त्याच्या हताशेच्या क्षणीही तो त्याच देवांची साथ मागतो.
सुख देवासी मागावे
दु:ख देवाला सांगावे
असा त्याचा सरधोपट म्हणावा असा भाबडा व्यवहार असतो. त्याचा देव त्याच्याबरोबर तसा असतो. एखादा असाही असतो की दिवसभर तो स्वत:च्या कुटुंबासाठी राब राब राबतो. दुपारी भाकरतुकडा खायला जेव्हा बांधाशी बसतो तेव्हा थकलेल्या शरीराची काळजी घेता घेता ‘रामराया!’ असे उत्स्फूर्त उद्गार त्याच्या तोंडून निघत असतात. आणि रात्री थकल्या जीवाची पाठ अंथरुणाला लागते त्यावेळी ‘विठ्ठला पांडुरंगा!’ असं सहज त्याच्या तोंडून निघतं! बस्स! बाकी काही करायला त्याच्याकडे खरोखरीच सवड नसते. त्यालाही आवडली असती देवपूजा करायला. देवळात जायला वेळ घालवायला. पण त्याचा प्रपंच त्याला तसं करू देत नाही. म्हणून मग
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी
असं म्हणत आपल्या कर्माला देव मानणं हा त्याचा विठ्ठल असतो. पण काही वेळा होतं असं, की पूजापाठ नामजप, उपचार, कीर्तन या सर्व गोष्टी या देवाला मिळवण्यासाठीच करायच्या असतात, हेच माणूस विसरून जातो. आणि कर्मकांडाला अधिक महत्त्व द्यायला लागतो. मग एक दिवस जाणवायला लागते की ज्याला देव म्हणतात त्याच्यापासून आपण फारच लांब पोहोचलेलो आहोत. आणि काही वेळा असं होतं की देवाचं नाव घेता घेता माणसाची अवस्था इतकी उन्मनी होऊन जाते की
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
इतकं सगळं करताना इथेही विठ्ठलच आणि तिथेही विठ्ठलच अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा आणि तेव्हाच इतके वर्ष केलेल्या उपासनेचा खरा परिणाम दिसायला सुरुवात होते. अभंग आहे नामदेव महाराजांचा. आणि पंडित भीमसेन जोशींमुळे कोणत्याही मराठी देहाला या अभंगाचा स्पर्श झाला नाही असा देहच नसेल. आपण करतो त्या सर्व उपचारांमध्येच विठ्ठल सामावलेला आहे याचा शोधच मुळी नामदेव महाराजांना उशिरा लागला असं त्यांनीच म्हटलेलं आहे. एक वेळ अशी होती की गोरोबांनी थट्टेत नामदेवांना कच्च मडकं म्हटलेलं त्यांना सहन झालं नव्हतं. त्यावर त्यांनी भांडण केलं होतं. ‘संत गोरा कुंभार’ मध्ये त्या संबंधित प्रवेशही आहे. प्रत्यक्ष पांडुरंग नामदेवांशी बोलत असत. तरीही त्यांचा क्रोध आणि हट्ट गेलेला नव्हता असे या प्रसंगा नंतर त्यांना जाणवलं आणि ते विसोबा चाटे यांच्याकडे गेले त्या वेळेला विसोबा चक्क शिवपिंडीवर पाय ठेवून निजले होते अशी आख्यायिका आहे आणि तूच माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव बाबा अशी त्यांनी नामदेवांना विनंती केली आणि नामदेवांनी ती विनंती पाळली. पण जिथे त्यांची पावलं उचलून जावे तिथे त्यांना शिवपिंडीच दिसू लागली आणि मग नामदेवांना उमगून आलं की परमेश्वर हा सर्वत्र असतो. प्रत्यक्ष तो आपल्याशी बोलत जरी असला तरी सर्वाभूती निर्गुण निराकार असणारं त्याचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्थूलातून सूक्ष्माकडे हे जावंच लागतं. वरील उदाहरण हे धर्माचा अपमान म्हणून न घेता वेळप्रसंगी गुरूंना आपल्या शिष्याला समजावण्यासाठी कोणतीही पातळी गाठावी लागते या अर्थानेच घ्यावं. थोडक्यात नामदेव महाराज ज्या नजरेने पाहत होते त्या नजरेप्रमाणे देव त्यांना दिसत होता. राष्ट्रपती पदक विजेत्या आणि साने गुरुजींच्या कथेवर आधारित असलेल्या श्यामची आई ह्या पिक्चरमध्ये एक अतिशय सुंदर गीत आहे. द्रौपदीसी बंधु शोभे नारायण. त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या ओळी आहेत.
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
कोणत्याही नात्याचं सारसर्वस्व ही अंतरीची खूण पटण्यामध्ये असतं. नाहीतर मग वर्षानुवर्षे एकाच घरात राहूनही व्यक्ती परस्परांना अनोळखीच राहतात. आणि क्वचित कधीतरी भेटलेली व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या, आंतरिकदृष्ट्या आपल्या फार जवळची आहे असा साक्षात्कार तंबोरा छेडल्यावर लागणाऱ्या स्वयंभू गंधारासारखाच एकाएकी होतो. आणि ज्या देवासाठी आपण आपलं आयुष्य झिजवतो त्या देवांनाही मानवी अवतार घेतल्यानंतरचे नात्यांचे ताणेबाणे आणि भावनांचे खेळ चुकलेले नसतात. म्हणून तर पंढरपुरातल्या विठ्ठलावर रुक्मिणी कायमची रुसलेली आहे. कोणत्याही नवराबायकोंमध्ये भांडण होणे स्वाभाविक आहे पण देव सुद्धा याला अपवाद असू नये का? तर नाही. आता माझा रंग झाला जळागत ही तटस्थ वृत्ती आल्यानंतर माणसाच्या लक्षात येतं, की देव जे मायेचे खेळ करून दाखवतो ते देव म्हणजे आपल्या कोणीतरी जवळचा आहे हे आपल्याला लवकर आणि चटकन उमजून जावं म्हणून. एरवी तो कणाकणात पसरलेला असतो. आपल्याला ते कळत नाही. पण त्यासाठी एक अट असते ते म्हणजे आपला रंग जळागत व्हावा लागतो. हा रंग जेव्हा जळागत होऊन जातो त्या वेळेला आपोआपच ‘केशर काजळ ज्याचे त्याचे’ हा अलिप्तपणा माणसात आपोआप येतो. कारण तेव्हा त्याला समजून चुकलेलं असतं की केशर असो किंवा काजळ असो माझ्यात येऊन जेवढे मिसळेल तेवढा त्याचा रंग माझ्यात पसरेल. पण मी प्रवाही आहे केशरही निघून जाईल आणि काजळही निघून जाईल. शिल्लक राहील ते नितळ स्वच्छ पारदर्शक पाणी! देव उमजावा कसा? देवबाभळीमधल्या आवलीला जसा उमजला होता ना तसा! तिला तो इतका चांगला उमजला होता की बाह्यत: कजाग भांडखोर वाटणारी ती बाई आतून विठ्ठलाला ही जाणून होती आणि आपल्या धन्यालाही. म्हणून रखुमाई तिच्या पायातला काटा काढायला आली खरी पण जाता जाता रखुमाईच्याच मनाला बोचलेला सल नावाचा काटा आवली हलक्या हाताने काढून केव्हा गेली ते तिलाही कळलं नसेल. म्हणूनच त्या नाटकातलं शेवटचं वाक्य फार फार हृदयस्पर्शी आहे. देव हा असा असतो. ज्याची त्याची समज, ज्याचा त्याचा रंग! केशर काजळ ज्याचे त्याचे!
अॅड. अपर्णा परांजपे प्रभु