मुंबईवर भगवा, भाजप-शिंदेसेनेचा डंका
प्रतिनिधी / मुंबई
महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले. या सर्व निवडणुकांची मतगणना शुक्रवारी करण्यात आली. तथापि, केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर साऱ्या देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर खिळले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतगणनेला प्रारंभ झाल्यानंतर महायुती प्रारंभापासूनच आघाडीवर होती. तथापि, महायुती आणि विरोधी पक्ष यांच्यातील अंतर अधिक नव्हते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे कोणत्या बाजूने फिरणार, याचे अनुमान काढता येत नव्हते. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत स्थिती जवळपास समसमानचे दिसत होती. तथापि, मतगणनेच्या अखेरच्या दोन तासांमध्ये महायुतीने निसटते बहुमत मिळवत विजय प्राप्त केला. भारतीय जनता पक्ष हा 89 जागांसह सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. या पक्षाने 173 जागांवर उमेदवार दिले होते. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 90 पैकी 29 जागांवर यश मिळाले.दुसऱ्या बाजूला, ही निवडणूक नजीक आलेली असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, हे चुलत बंधू आणि हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कौटुंबिक तसेच राजकीय वारसदार 20 वर्षांचे मतभेद मिटवून एकत्र आल्याने ही निवडणूक अधिकच लक्षवेधी झाली होती. पण या बंधूंची ही युती विजयाप्रत पोहचू शकली नाही. उद्धव ठाकरे यांच्या सेनेने 162 जागांवर लढत दिली होती. त्यांच्यापैकी 66 जागांवर यश मिळविले. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 52 जागांपैकी 6 जागांवर विजय मिळविला. तिसऱ्या आघाडीच्या स्वरुपात लढलेल्या काँग्रेसला 24 जागा मिळाल्या असून एमआयएम या पक्षाने 8 जागा घेत मुंबई महानगरपालिकेत प्रथमच लक्षणीय यश मिळविले आहे. काँग्रेसशी युती करुन मैदानात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीला मात्र एकही जागा मिळविता आलेली नाही. एकंदर, ही निवडणूक मुंबईच्या स्थानिक राजकीय इतिहासात महत्वाचे परिवर्तन करणारी ठरली आहे, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी मतगणनेनंतर व्यक्त केली आहे.
राज्यभर महायुतीचाच बोलबाला
29 पैकी 21 महापालिकेवर भाजपने विजयाचा झेंडा फडकवला आहे. चंद्रपूर, वसई-विरार, लातूर, भिवंडी, अमरावती आणि परभणी या महापालिकांमध्ये काँग्रेस, एमआयएम, बहुजन विकास आघाडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षाने सत्ता मिळवली आहे. पण महापालिकांमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मुंबईच्या खालोखाल महत्व असलेल्या ठाणे महानगरपालिकेत शिंदे यांच्या शिवसेनेने प्रथम क्रमांकाच्या जागा मिळविल्या असून भाजपचेही सहकार्य त्यांना मिळणार आहे. त्यामुळे येथेही महायुतीचाच महापौर होणार हे निश्चित झाले आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, मिरा भाईंदर, तसेच नवी मुंबई, नांदेड या महापालिकांमध्ये भाजपने आपले वर्चस्व मिळवले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांमध्ये महायुती म्हणुन शिवसेना आणि भाजपला यश मिळताना दिसले. महापालिकांचे निकाल बघता भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बालेकिल्ले काबीज केले आहेत. मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्ष सत्ता असलेल्या उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावला आहे. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आपले वर्चस्व मिळवले आहे.
भाजपकडे प्रथमच आलेल्या महापालिका
महापालिका निवडणुकीचे निकाल बघता, भाजपने इतर पक्षांमधून आलेल्या शिलेदारांच्यावतीने महापालिकेत पहिल्यांदा सत्ता मिळवली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या साथीने पहिल्यांदा सत्ता मिळवणार आहे. तर सोलापूर महापालिकेत सुभाष आणि विजय देशमुख यांच्या साथीने नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या साथीने तर पनवेलमध्ये प्रशांत ठाकुर यांच्या साथीने महापालिकेत सत्ता स्थापन करण्या इतके संख्याबळ मिळवले आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता मोडीत
मुंबई महापालिकेवर वर्चस्व असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता मोडीत काढत भाजपने मुंबईसह राज्यातील 21 शहरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात यश मिळाले असले तरी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
भाजपची 21 शहरांवर सत्ता
राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये भाजपची लाट पाहायला मिळाली. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या ‘बिग फोर’ शहरांसह एकूण 21 महापालिकांवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. यात मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, जळगांव, अहिल्यानगर (अहमदनगर), जालना, नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांचा समावेश आहे.
भाजपचा मुंबईत झंझावात
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झंझावात दिसून आला. 227 जागांपैकी भाजपला 96 जागांवर विजय मिळाला आहे. अजून काही जागांवर आघाडी आहे. तर शिंदे सेनेला फक्त 26 जागांवर विजय मिळाला आहे. अजून त्यांची काही जागांवर आघाडी आहे. या निकालातून भाजपने मोठा विजय मिळवल्याचे अधोरेखित होत आहे.
हा विजय म्हणजे सुशासनावरील शिक्कामोर्तब : पंतप्रधान
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीने मिळवलेल्या दैदीप्यमान यशाची दखल आता थेट दिल्लीतून घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानले असून, हा विजय म्हणजे एनडीएच्या सुशासनावरील शिक्कामोर्तब असल्याचे म्हटले आहे. ‘महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते आता अधिक दृढ झाले आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी राज्यातील मतदारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
बाळासाहेबांचे आशीर्वादआपल्याच पाठीशी : मुख्यमंत्री
लोकांना विकास हवा आहे म्हणून त्यांनी आपल्याला निवडून दिले आहे. तसेच या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, जनतेचा विश्वास हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचेही मी स्मरण करतो, कारण त्यांचा आशीर्वाद हा आपल्याच पाठीशी होता, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.