सॅफ’ फुटबॉल चॅम्पियनशिपची सुरुवात भारत-पाक लढतीने
वृत्तसंस्था, ढाक़ा : दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ बांगलादेशात ‘सॅफ‘ फुटबॉल चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी सज्ज झाला असून, 5 नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-प्रोफाइल सामन्याने या बहुप्रतिक्षित स्पर्धेचा शुभारंभ होईल.
सर्व तयारी पूर्ण झाली असून, सहभागी देशांचे प्रतिनिधी आणि खेळाडू ढाक्यात दाखल होऊ लागले आहेत. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस पी. कट्टेल यांनी सांगितले, ‘दीर्घ काळानंतर बांगलादेशात ‘सॅफ‘ चॅम्पियनशिपचे आयोजन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या स्पर्धेत बांगलादेश, भूतान, मालदीव, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका असे सहा संघ सहभागी होत आहेत. दुर्दैवाने, फिफाच्या निलंबनामुळे नेपाळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही.’ त्यांनी पुढे सांगितले, ‘आम्ही या स्पर्धेत पहिल्यांदाच ‘व्हीएआर’ प्रणाली लागू करण्याचे नियोजन करत आहोत. दक्षिण आशियामध्ये असे पहिल्यांदाच घडणार आहे. आम्ही उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात याचा वापर करणार आहोत. गट टप्प्यादरम्यान एक चाचणी (टेस्ट रन) घेतली जाईल, परंतु ती केवळ अंतर्गत उद्देशांसाठी असेल.’ 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याला बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
