बांधकाम कामगारांचे सुरक्षाकवच : कामगार कार्ड
बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्वांची नोंदणी आवश्यक : सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना
बेळगाव : बांधकाम कामगारांसाठी कामगार खात्याकडून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार कार्ड असणे जरुरीचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून अनेक वेळा जनजागृती केली जात असली तरीही बांधकाम कामगारांमध्ये अद्यापही कामगार कार्डासंबंधी म्हणावी तशी जागृती झालेली नाही. त्यामुळेच अनेक जण अद्यापही कामगार कार्डापासून वंचित आहेत. कामावर असताना एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कामगार कार्डचे महत्त्व प्रकर्षाने जाणवत आहे.
त्यामुळे बांधकाम कामगारांनी कामगार कार्ड करून घेणे जरुरीचे आहे, असे आवाहन कायदेतज्ञांकडून केले जात आहे. कर्नाटक सरकारने कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजनांपैकी कर्नाटकात राबविलेली कामगार कार्ड योजना अत्यंत महत्त्वाची आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व कामगारांना याचा फायदा घेता येतो. बिल्डींग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्क्स (रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडीशन ऑफ सर्व्हिस) अॅक्ट-1996 कायद्याची अंमलबजावणी 2007 साली कर्नाटकात सुरू करण्यात आली.
कामगार कार्ड कोणाला मिळते?
बांधकाम क्षेत्रात काम करणारे प्लंबर, सेंट्रींग, गवंडी, सुतार, पेंटर, इलेक्ट्रिशियन, लोहार,फॅब्रिकेटर त्याचबरोबर काचेचे काम आणि फरशी बसविणारे कामगार यामध्ये मोडतात. इतकेच नव्हे तर रस्तेबांधणी, पूल, दगड फोडणारे, खडी वाहून नेणारे मजूर कामगार कार्डासाठी पात्र आहेत.
कामगार कार्ड मिळविण्यासाठी महिला-पुरुष कामगारांना असलेले नियम-अटी
- कामगार हा कर्नाटकचा रहिवासी असावा. आधारकार्ड, पॅनकार्ड व बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- संबंधित कामगाराने कामगार खात्याकडे नोंदणी करणे आवश्यक असून त्याच्याकडे कामगार कार्ड असले पाहिजे.
- कामगाराचे वय 18 ते 60 वर्षांच्यादरम्यान असणे जरुरीचे आहे.
कामगार कार्डचे फायदे
- कामगाराने वयाची साठी गाठल्यास मासिक दोन हजार रुपये पेन्शन
- कामगारांना घर बांधण्यासाठी किंवा जागा घेण्यासाठी मदत
- कामगारांना कर्जसुविधा
- कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जेणेकरून कामगारांना नवीन नोकऱ्या मिळण्यास मदत होईल
- कामगारांसाठी विशेष विमा योजना
- कामगार कार्डधारकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्राथमिक ते पदवीपर्यंत 20 हजार रुपये शिष्यवृत्ती
- महिला कामगारांना पहिल्या दोन प्रसुतींसाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत
- कामगाराच्या पत्नीला पहिल्या दोन प्रसुतींसाठी 50 हजार रु.
- कामगारांना औषध उपचारासाठी किंवा दुर्धर आजारासाठी आर्थिक मदत
- कामगारांना सायकल खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत
- आई-मूल साहाय्य हस्त या योजनेंतर्गत बाळाच्या जन्मानंतर तीन वर्षांपर्यंत संगोपनासाठी दरमहा पाचशे रुपयांची महिला कामगाराला आर्थिक मदत
- पुरुष कामगार किंवा महिला कामगार व त्यांच्या मुलांच्या विवाहासाठी 60 हजार रुपयांची आर्थिक मदत
- कामाच्या ठिकाणी कामगार जखमी झाल्यास इस्पितळाचा खर्च मर्यादेपर्यंत
- कामगार कार्डधारकांच्या आई-वडिलांनादेखील मोफत आरोग्य सुविधा
- कामगार कार्डधारकाचा घरातून कामावर जाताना, कामावर असताना किंवा कामावरून घरी येताना अपघात झाला व त्यात त्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाख रुपयांची भरपाई
- कामगार कार्ड हवे असल्यास वर्षात किंवा किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे आवश्यक
- कामगाराला कामावर असताना कायमचे अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार त्यांना आर्थिक मदत म्हणून 1 ते 3 लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळते
- कामगाराचा इतर आजाराने मृत्यू झाल्यास नातेवाईकांना अपघात साहाय्य योजनेंतर्गत 6 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते
कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कर्नाटक सरकारच्या कामगार खात्याकडून अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगारांकडे कामगार कार्ड असणे जरुरीचे आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांनी कामगार खात्याकडे आपली नोंदणी करून कामगार कार्ड मिळवावे, जेणेकरून आपत्कालीन काळासह इतर वेळी त्याचा लाभ घेता येईल.
-अॅड.मारुती कामाण्णाचे
