साध्वी ठाकूर, पुरोहितांसह 7 जण निर्दोष
मालेगाव 2008 बॉम्बस्फोट : 17 वर्षांनंतर एनआयए विशेष न्यायालयाचा निर्णय
मुंबई : मालेगाव 2008 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह सातजणांची मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी यंत्रणांच्या तपासावर बोट ठेवले आहे. 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी हा निर्णय दिला. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय (निवफत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी अशी मुक्त केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दहशतवादविरोधी आणि युएपीएअंतर्गत खटला चालवण्यात आला होता. याशिवाय श्याम साहू, प्रवीण टक्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आले आहे.
सलग सात वर्षे या खटल्याची नियमित सुनावणी झाली. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी आणि सुनावणीनंतर न्यायालयाने 19 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता.
दरम्यान, न्यायाधीश ए. के. लाहोटी यांची नाशिक येथे बदली झाली. उन्हाळी सुट्टीनंतर 9 जून रोजी न्यायालये पुन्हा सुरू झाल्यानंतर तो बदलीचा आदेश लागू होणार होता. मात्र त्याआधीच बॉम्बस्फोटपीडित कुटुंबीयांतर्पे शाहिद नदीम यांनी लाहोटी यांच्या बदलीच्या आदेशावर आक्षेप घेतला होता. न्यायाधीशांच्या बदलीमुळे न्यायदानावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी लाहोटी यांच्या बदलीचा आदेश स्थगिती देत त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्टपर्यंत वाढवला. अखेर न्यायालयाने 31 जुलै निकालाची तारीख निश्चित केली. त्या नुसार सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोश मुक्त केले.
न्यायाधीश लोहोटी काय म्हणाले?
एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश लोहोटी निकालाचे वाचन करतांना म्हणाले की, बॉम्बस्फोट झाला त्याठिकाणचा पंचनामा योग्य नाही. आरडीएक्स बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा कुठलाही पुरावा नाही. फक्त संशयाच्या आधारावर शिक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असेही न्यायाधीशांनी म्हटले. तसेच जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाहीत, असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. दुचाकीचा चेसीनंबर देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर दुचाकीची मालक होती, हेदेखील स्पष्ट नाही. आरोपींना आधी लावलेला मोक्कानंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक आहेत. बॉम्बस्फोटात जे जखमी झाले किंवा मफत्यू झाले ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध कऊ शकला आहे, असेही निरीक्षण न्यायाधीशींनी नोंदवले .
या आरोपींची निर्दोष मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवफत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी ऊर्फ स्वामी अमफतानंद, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसीची कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवादघविरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला होता. त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. तर श्याम साहू, प्रवीण टककी, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आले होते.
नेमकं काय घडलं होतं?
मालेगाव शहरातील भिक्कू चौकात रमजाननिमित्त खरेदीसाठी गर्दी झाली असतांना 29 सप्टेंबर 2008 मध्ये दुचाकीव्दारे घडविलेल्या बॉम्बस्फोटात 6 जण ठार तर शंभराहून अधिक नागरीक जखमी झाले होते. रात्री 9 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास दुचाकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने परिसर हादरला होता. या स्फोटात परवीन शैख, मुस्ताक शंख, रफिक शेख, इरफान खान, अजहर सय्यद, हारून शहा या 6 लोकांचा मफत्यू झाला होता. या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडून पळापळ झाली होती. प्रारंभी स्फोट कशाचा झाला हे समजत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र स्फोटामुळे छिन्नविछीन्न झालेल्या दुचाकीमुळे हा बॉम्बस्फोट असल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक संतप्त झाले होते.
या घटनेनंतर भिकू चौकात मोठा जमाव जमला होता, स्फोटातील जखमींना मनपासह शहरातील खाजगी रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने रात्रीतूनच सशस्त्र पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. एकूण 323 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येवून आरोपींना खटल्यासंदर्भात माहिती देण्यात येवून त्यांचे जबाब नोंदविले गेले होते. त्यानंतर आज या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल मुंबई येथे विशेष एनआयए न्यायालयात देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
काँग्रेसने माफी मागावी : मुख्यमंत्री फडणवीस
काँग्रेसप्रणित युपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा नरेटीव सेट करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू व भगवा आतंकवाद आहे, हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. निवडणूकीमध्ये अल्पसंख्यांकाचे लांगुल चालन करण्यासाठी भगवा आंतकवाद दाखविण्याचा जो प्रय्तन केला तो किती खोटा हे आज सिद्ध झाले. कोर्टाने पुराव्यानिशी आज सांगितले आहे. ज्यांवर कारवाई केली, त्यांची काँग्रेसने माफी मागावी,त्याच बरोबर सगळ्या हिंदु समाजाची माफी मागामवी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हा भगव्याचा, हिंदुत्वाचा विजय...
न्यायालयाचा निर्णय हा भगव्याचा आणि हिंदूत्वाचा विजय आहे. तपास यंत्रणेने माझ जीवन बरबाद केले. प्रचंड छळ केला. मी संन्याशी जीवन जगत असतानाही मला त्रास दिला. सतरा वर्षे खटला चालला. मला अनेक वेळ कलंकीत करण्यात आले. आज माझा नाही तर भगव्याचा आणि हिंदूत्वाचा विजय झाला आहे.
- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर