सदाशिवनगर स्मशानभूमीच्या शेडचे काम अंतिम टप्प्यात
स्मशानभूमीतील जागेत मनपाची कचरा वाहतूक वाहने : कचऱ्याचे ढीगही पडून असल्याने नागरिकांतून नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये असलेल्या एका शेडवरील पत्रे घालण्याचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही आणखी एका शेडचे काम करून त्यावर पत्रे घालणे बाकी आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्मशानभूमीमध्ये कचरा वाहतूक करणारी वाहने तसेच सर्वत्र कचरा पडून स्मशानभूमी म्हणजे कचऱ्याचा डेपो आहे का? याची प्रचिती त्याठिकाणी गेल्यानंतर येत आहे. अनेकवेळा बैठकांमध्ये यावर चर्चा होऊनही अद्याप तरी या स्मशानभूमीमधील वाहने हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर तेथे कचऱ्याचे ढीगही पडून आहेत. त्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीतील शेडवरील पत्रे खराब झाले होते. त्यामुळे नव्याने त्या स्मशानभूमीची बांधणी करून पत्रे घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली. तातडीने पूर्वीचे पत्रे काढण्यात आले. मात्र त्यानंतर बरेच दिवस हे काम रेंगाळले होते. आता त्या शेडवरील जुन्याच भिंतीवर थोडी बांधणी करून शेडची उंची वाढविण्यात आली. त्यानंतर त्यावर पत्रे बसविण्यात आले आहेत. नव्याने पत्रे बसविले तरी शेडची इतर कामे मात्र दर्जात्मक तसेच पूर्ण अजुनही करण्यात आली नाहीत. पत्रे घातल्यामुळे सध्या पावसापासून संरक्षण मिळाले आहे.
मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
या स्मशानभूमीमध्ये महानगरपालिकेची कचऱ्याची वाहने पार्किंग केली जात आहेत. ती वाहने एपीएमसी रोडवरील महानगरपालिकेच्या मोठ्या इमारतीच्या तळ मजल्यात खुल्या जागेमध्ये पार्किंग करावी अशी सूचना स्थायी समितीमध्ये अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र अजूनही या बाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही. स्मशानभूमीतील खुल्या जागेमध्ये ही कचरा वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील रस्ता खराब आणि खुल्या जागेमध्ये वाहनांच्या रहदारीमुळे मोठे ख•s पडले आहेत. त्याठिकाणी पावसमुळे चिखलही झाला आहे. तेव्हा याकडे महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यावर पाणी साचून
गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे स्मशानभूमीतील रस्त्यावर पाणी साचून आहे. या रस्त्यावरूनच महानगरपालिकेची वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे ख•s पडत आहेत. तेव्हा या रस्त्यांचीही दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग
सदाशिवनगर येथील स्मशानभूमी म्हणजे कचऱ्याचा डेपोच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मृतदेहावर अंत्यविधी करताना हार तसेच इतर साहित्य काढून बाजूला ठेवले जाते. ते संपूर्ण साहित्य स्मशानभूमीतील खुल्या जागेमध्येच फेकून देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून आहेत.