For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदाशिवगड पीएचसीची सुसज्ज इमारत उभारणार

01:43 PM Feb 22, 2025 IST | Radhika Patil
सदाशिवगड पीएचसीची सुसज्ज इमारत उभारणार
Advertisement

कराड : 

Advertisement

वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तोकडी पडत आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाच्या नवीन इमारतीचा समावेश करण्यात आला आहे. मार्चनंतर पाठपुरावा करून प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून सदाशिवगडला सुसज्ज इमारत बांधण्यात येईल, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग मोहीम व आरोग्य तपासणी शिबिर तसेच नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार मनोज घोरपडे बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी नरेंद्र माळी, बनवडीच्या सरपंच अश्विनी मदने, हजारमाचीच्या उपसरपंच जयश्री पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

आमदार घोरपडे म्हणाले, भाजपा सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्मार्ट शाळा व स्मार्ट पीएचसी मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णालयांतून सर्वप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदाशिवगडलाही सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. सदाशिवगड आरोग्य केंद्रासाठी अनेक दिवसांपासून रुग्णवाहिकेची मागणी प्रलंबित होती. तांत्रिक कारण देत सदाशिवगडला रुग्णवाहिका नाकारण्यात आली होती. मात्र सदाशिवगड आरोग्य केंद्राचा विस्तार व गरज लक्षात घेऊन सदाशिवगडसाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कराड उत्तरमधील अनेक गावांत रस्ते, पाणी व गटर आदी मूलभूत सुविधांची वाणवा आहे. बाबरमाची रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यासाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. येणाऱ्या काळात कराड उत्तरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.

सागर शिवदास म्हणाले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरी यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात नवीन इमारतीचा समावेश करण्यात आला आहे. आमदार मनोज घोरपडे यांनी लक्ष घालून यासाठीचा साडेचार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा.

चंद्रकांत मदने म्हणाले, सदाशिवगड आरोग्य केंद्रातील रुग्णांची संख्या पाहता येथे औषधाचा नेहमीच तुटवडा भासतो. त्यामुळे पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. राजू सूर्यवंशी म्हणाले, सध्याची आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत तोकडी असून सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे सदाशिवगडला लवकरात लवकर नवीन इमारत मिळावी.

यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, डॉ. सुनिता थोरात, प्रकाश पवार, विनोद डुबल, विशाल पुस्तके, शिवाजीराव डुबल, अतुल पवार, संभाजी पिसाळ आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक राजू सूर्यवंशी तर आभार जयश्री पवार यांनी मानले.

  • आमदारांकडून ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल

सदाशिवगड आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असतानाही केबीन मोकळी पडत असल्याबाबत ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल आमदार मनोज घोरपडे यांनी घेतली. रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र येथे येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. कुठल्याही परिस्थितीत कार्यालयीन वेळेत रुग्णालयात डॉक्टर उपस्थित असणे बंधनकारक आहे. आवश्यकता भासल्यास सदाशिवगडसाठी आणखी एक डॉक्टरची नेमणूक करण्यात येईल, असे आमदार घोरपडे म्हणाले.

Advertisement
Tags :

.