सदानंद तानावडे यांची माघार सावईकर, नाईक यांच्यात चुरस
पणजी : एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये प्रदेश भाजप अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपद नको, नव्याने कोणालातरी संधी द्यावी, असे पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना कळविले आहे. त्यामुळे आता अॅड. नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक यांच्या दरम्यान प्रदेशाध्यक्षपदासाठी स्पर्धा होईल. खासदार सदानंद शेट तनावडे यांना बहुतेक आमदार आणि मंत्र्यांनी देखील पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यासाठी आपला जोरदार पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर तानावडे हे पुन्हा एकदा अध्यक्षपद सांभाळतील, अशी अपेक्षा होती. मात्र काल रविवारी तानावडे यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. पक्षातील नव्या दमाच्या कोणत्याही नेत्याची निवड करण्यास हरकत नाही आणि अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करण्यात यावे, असे कळविले.
पक्षाच्या नेत्यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. येत्या रविवारपर्यंत प्रदेश भाजप अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते. सात नावे पक्षाकडे आली होती, त्यापैकी अंतिम यादीमध्ये तीन नावे निश्चित करण्यात आली. त्यात सदानंद शेट तानावडे तसेच अॅड. नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक यांचा समावेश होता. सावईकर यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात मिळणारी उमेदवारी टाळण्यात आली होती, त्यामुळे आता कदाचित त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. दामू नाईक हे माजी आमदार असून ते भंडारी समाजाचे नेते आहेत. सध्या भंडारी समाज भाजपपासून दूर जात आहे. यामुळे त्या समाजाला भाजपकडे ओढण्यासाठी दामू नाईक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. भाजपचे पक्षश्रेष्ठी यासंदर्भात येत्या दोन दिवसात चर्चा करतील आणि त्यानंतर नवी दिल्लीहून दोघांपैकी एकाच्या नावावर पसंती दर्शविली जाईल. त्यानंतर भाजपच्या गोव्यातील आमसभेमध्ये नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येईल.