सदानंद तानावडे हेच पुन्हा प्रदेशाध्यक्ष?
पाच नावे केंद्रीय समितीकडे रवाना : राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग गोव्यात
पणजी : भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेजण इच्छूक असले तरी पक्षाने अॅड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक, दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, गोविंद पर्वतकर ही नावे निश्चित करून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात आलेली आहेत. तरीही तानावडे यांच्या कामावर केंद्रीय नेतृत्व खूष असल्याने त्यांच्याच नावाचा विचार केंद्रीय नेतृत्वाने चालवला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. तानावडे यांच्याकडेच पुन्हा प्रदेशाध्यक्षपद येण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग हे गोव्यात दाखल झाले आहेत. अऊण सिंग हे भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, गोव्यातून प्रदेशाध्यक्षपदासाठी नावे दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनाच नवा प्रदेशाध्यक्ष निवडावा की, तुम्ही ही जबाबदारी पुन्हा घेण्यास तयार आहात का अशी विचारणा केलेली आहे. तरीही जी नावे पक्ष नेतृत्वाकडे दिलेली आहेत, त्याबाबत हा निर्णय केंद्रीय नेतृत्वानेच घ्यावा, असे तानावडे यांनी केंद्रीय नेतृत्वाला सूचवले आहे. तरीही पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडण्यासही तयार असल्याचेही तानावडे यांनी सांगितले आहे. सदानंद शेट तानावडे यांच्या काळात पक्षाच्या कार्याचा वाढता आलेख राहिलेला आहे. संघटनाही मजबूत झालेली आहे. त्यामुळे गोव्यातील कार्यकर्त्यांत पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून तानावडे हेच योग्य असल्याचे बोलले जात आहे.
तानावडे यांच्या पाठिशी माविन गुदिन्हो
उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रदेशाध्यक्षपदी सदानंद शेट तानावडे यांनाच कायम ठेवावे, अशी मागणी करून त्यांच्याइतका सध्यातरी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी तगडा नेता नसल्याचे सांगितले आहे. गुदिन्हो यांनी सदानंद शेट तानावडे यांच्यासाठी जोरदार फिल्डींग लावलेली आहे. तानावडे यांच्या नावाचा विचार न झाल्यास 2027 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. तानावडे हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे तसेच संघटन बांधणीसाठी तेच योग्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सदानंद शेट तानावडे यांच्या नावाचा केंद्रीय नेतृत्व विचार करेल, असे सध्याचे तरी चित्र आहे.