Sadale Madale: शिवलिंग आकाराची टेकडी, जुनं मंदिर, सादळे-मादळेची पर्यटकांना भुरळ
हिल टॉप पिकनिक पॉईंट म्हणून सादळे - मादळेचा विकास होणे गरजेचे
By : सतीश पाटील
Sadale Madale Dongar Tourism (शिये) : पावसाळ्यातील इंद्रधनुष्यांच्या छटांमध्ये अनुभवायला मिळणारे तुषार आणि उन्हाळ्यात स्वच्छ वातावरणात मिळणारी थंडगार हवा हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हिल टॉप पिकनिक पॉईंट म्हणून सादळे - मादळेचा विकास होणे गरजेचे आहे.
जोतिबा-पन्हाळ्याकडे ये जा करणारा भाविक आणि पर्यटक या परिसरात काही काळ विसावा घेतो. परिसरात हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिकांनीही मोठी गुंतवणूक केली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम सुविधा येथे उपलब्ध आहे.
वनसंपदा, जैवविविधतेने नटलेला परिसर
परिसर डोंगररांगा आणि हिरव्यागार वनराईने नटला आहे. परिसरात साग, पळस, करंज, कांचन, ग्लेडेसीडीसिया ही प्रमुख झाडे आहेत. करवंद, घाणेरी, निरगुडी, चिवाकाठी, बेट यासारखी झुडुपवर्गीय झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.
शिवलिंगाच्या आकाराच्या टेकडीवरील सिद्धोबा मंदिर
सादळेच्या उत्तरेला शिवलिंगाच्या आकाराची टेकडी आहे. टेकडीवर सिद्धोबाचे पुरातन मंदिर आहे. मंदिराचा गावकरी व परिसरातील भाविकांनी लोकवर्गणीतून जीर्णोद्धार केला आहे. मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी डांबरी, कॉक्रीटचा पक्का रस्ता आहे. पायथ्यापासून मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यावरून जावे लागते.
सिद्धोबाचे मंदिर परिसरातून दक्षिणेला पंचगंगा नदीसह शहराचा परिसर नजरेस येतो. उत्तरेला वारणा खोऱ्याचा परिसर दिसतो. पूर्वेकडे राष्ट्रीय महामार्ग क्र. चार दृष्टीस येतो. पश्चिमेला जोतिबा डोंगराचा परिसर दिसतो. या टेकडीवरून सभोवतालचा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो.
प्राणी, पक्ष्यांचे दर्शन
गवा, साळींदर प्राण्यासह आहे. बिबटे, घोरपड, ससा, , रानडुक्कर, कोल्डा या मोरांचीही संख्या लक्षणीय अन्य विविध पक्षीही परिसरात आढळून येतात.
जोतिबा एसटीच्या फेऱ्या सादळे मादळेमार्गे करा
"सध्या सादळे-मादळेकडे ये-जा करण्यासाठी केवळ खासगी प्रवासी वाहतुकीचा वापर केला जात आहे. सामान्यांनाही या निसर्गाचा आस्वाद घेता येण्यासाठी परिवहन महामंडळाने जोतिबाकडे जाणाऱ्या एसटीच्या काही फेऱ्या यामार्गे केल्यास पर्यटनाला चालना मिळेल."
- जालिंदर पोवार, माजी अध्यक्ष, तंटामुक्त समिती, सादळे मादळे
ग्रामपंचायतीचे नेहमीच पर्यटनाला प्रोत्साहन
सादळे मादळे ग्रामपंचायतीने नेहमीच येथे पर्यटनाच्या दृष्टीने वाढत असलेल्या व्यवसायांना सहकार्य केले आहे. गावातील काही तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत. येथे हॉटेल, रिसॉर्टमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने या परिसराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
- सतीश चौगले, उपसरपंच, सादळे मादळे
पर्यटकांसाठी सर्व सुविधा येथे उपलब्ध
सादळे मादळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी व्यावसायिक म्हणून गुंतवणूक करत आहोत. रिसॉर्टप्रमाणेच रॉकगार्डनच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे काम सुरू आहे. पर्यटकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी स्थानिकांसह ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळत आहे.
- अविनाश बेडेकर, निसर्ग रिसॉर्ट, व्यावसायिक सादळे-मादळे