For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हातकणंगलेवर सदाभाऊ खोत यांचा जोरदार दावा! मतदार संघ 'रयत'ला सोडण्याचा आग्रह

11:56 AM Mar 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
हातकणंगलेवर सदाभाऊ खोत यांचा जोरदार दावा  मतदार संघ  रयत ला सोडण्याचा आग्रह
Sadabhau Khot
Advertisement

महायुतीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच : मतदारसंघ न सोडल्यास सदाभाऊ यांना काय वाटा मिळणार

युवराज निकम इस्लामपूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला सोडावा, यासाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आग्रही आहेत. ते स्वत: येथून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र सध्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी आहेत. हातकणंगले मतदारसंघ न सोडल्यास घटक पक्ष म्हणून भाजपा रयत क्रांती संघटनेला सत्तेत काय वाटा देणार, याबाबत उत्सुकता आहे.

Advertisement

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळी सदाभाऊ व माजी खासदार राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यात रान उठवले. त्यावेळी सत्तेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा होता. हे दोन्ही शेतकरी नेते भाजपाकडे खेचण्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले. या जोडीमुळे भाजपाला मदतच झाली. त्या बदल्यात भाजपाने खोत यांना विधानपरिषदेवर घेवून कृषी राज्यमंत्री पदाची संधी दिली. शेतकऱ्याचं पोरगं मंत्री झाल्याचे कौतुक राज्यभर झाले. पण सदाभाऊ यांची मुदत संपली. पुन्हा ते आमदारकीसाठी प्रयत्नशील होते. पण राज्यातील राजकारण व सत्तेच्या बदलत्या समीकरणात ते मागे पडत गेले. आता त्यांना राज्यातील सत्तेत संधी मिळण्याची आशा अंधुक झाली आहे.
लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. या आठवडाभरात कधीही आचारसंहिता लागू होवून रणांगण लागणार आहे. सर्वच पक्षात सध्या उमेदवार निश्चित करण्यासाठी हातघाई सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी अनेक दिग्गज आग्रही आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघ प्रत्येक निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज’ बनतो. यावेळीही हा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच तापला आहे. भाजपाने गेल्या वर्षभरापासून या मतदार संघात लक्ष घातले आहे. शेट्टी आणि भाजपामध्ये अंतर पडले आहे. त्यामुळे ते ‘एकला चलो रे’ च्या भुमिकेत आहेत. गत निवडणुकीत शेट्टी हे महाविकास आघाडी बरोबर लढले. पण त्यांना पराभूत व्हावे लागले. इथून शेट्टी यांची स्वबळावर उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी दौरे सुरू केले आहेत. पण महायुती व महाविकास आघाडीतील तिढा अद्याप सुटलेला नाही.

मविआ पर्यायाने शिवसेना उध्दव ठाकरे गट शेट्टी यांनाच पाठिंबा घेण्यासाठी मागे लागली आहे. पण ते आढेवेढे घेत असल्याचे समजते. त्यामुळे मविआला चांगल्या उमेदवाराचा पर्याय द्यावा लागेल. महायुतीने चाचपणी सुरू ठेवली आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने पुन्हा एकदा दावा करीत आहेत. तर भाजपा यावेळी आपला उमेदवार देण्याच्या हालचाली करीत आहे. अशातच सदाभाऊ खोत हे शड्डू मारून हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला सोडण्यासाठी दबाव वाढवून आहेत. त्यांना इथून उभा राहून आपले जुने सहकारी शेट्टी यांना धोबीपछाड करायचे आहे. पण महायुती काय निर्णय घेते, यांकडे सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement

अस्तित्वासाठी संघर्ष
सदाभाऊ खोत यांचा सत्तेतून बाजूला झाल्यानंतर अस्तित्वासाठी संघर्ष सुऊ आहे. ते खास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समजले जातात. इस्लामपुरात त्यांनी रयत क्रांती संघटनेची शेतकरी-कामगार परिषद घेऊन शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळीही त्यांनी हातकणंगलेची मशागत, पेरणी आपण केली, पण पीक दुसरेच नेतात, अशी खंत व्यक्त केली. याचवेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी देईल, त्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करू, हे सांगण्यास विसरले नाहीत. याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सदाभाऊ यांना पूर्ण ताकद देवू, असे म्हणाले. त्यामुळेच लोकसभेला दबावतंत्र वाढवून विधानसभेपर्यंत सत्तेतील काही ना काही वाटा मिळवायचा सदाभाऊ यांचा डाव असू शकतो, असा अंदाज आहे.

Advertisement
Tags :

.