For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्रीपद गेलं...गाड्या गेल्या...गाडीवालं बी गेलं...मी एकटाच...सत्ता लई वाईट; सदाभाऊंनी ग्रामिण ढंगात व्यक्त केली खंत

07:11 PM Apr 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
मंत्रीपद गेलं   गाड्या गेल्या   गाडीवालं बी गेलं   मी एकटाच   सत्ता लई वाईट  सदाभाऊंनी ग्रामिण ढंगात व्यक्त केली खंत
Sadabhau Khot
Advertisement

अभिजीत खांडेकर / तरुण भारत

जनसामान्यांच्या मनावर आरूढ व्हायचं असेल तर त्यांच्या सारखंच राहीलं पाहीजे..आणि त्यांच्यासारखंच बोललं पाहीजे हे यशस्वी नेत्याचं गुपीत आहे. निवडणुकांच्या काळात अनेक भाषणे होत असतात. सध्याच्या राजकारण्यांच्या भाषणामध्ये फक्त टिकेची राळ आणि वैयक्तीक रोष हा 'ट्रेंड' चालु आहे. मात्र काही नेत्यांची भाषणे ही त्यांच्या अस्सलपणामुळे आणि खुमारदार वर्णनामुळे लक्षात राहतात. विरोधकांवर टिका करतानाच स्वत:वरही जाहीर विनोद करणारे नेते दुर्मिळ आहेत. कोणत्याही प्रकारे आपली राजकिय नेत्याची छबी बदलणार नाही याची काळजी नेहमीच राजकिय नेते घेतात. मुंबई, पुणे अशा मेट्रो सिटीतील नेत्यांचे विनोद वेगळे...ग्रामिण नेत्यांचे विनोद वेगळे. मात्र त्यातील खुमासदारपणा सगळ्यांनाच भावतो.

Advertisement

पहा VIDEO >>> मंत्रीपद गेलं...गाड्या गेल्या...गाडीवालंबी गेलं...मी एकटाच...सत्ता लई वाईट

पश्चिम महाराष्ट्र हा अनेक नेत्यांची खाण म्हणून ओळखला जातो. आपल्या गावाकडची भाषा थेट व्यासपीठावर बोलण्यासाठी प्रसिध्द असलेले माजी मंत्री सदाभाऊ खोत हे सध्या त्यांच्या एका नव्या भाषणामुळे चर्चेत आहेत. आपल्या भाषणामुळे नेहमीच माध्यमांचे आणि आपल्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अजितदादा पवार यांच्या जगप्रसिद्ध 'धरणतील पाणी' या प्रकरणानंतर सदाभाऊ खोतांनी त्यांच्यावर केलेली अस्सल ग्रामिण ढंगातील विनोदी पण धारदार टिका सगळ्याच्या लक्षात राहीली. तसेच एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील आंदोलनामध्ये माध्यमांसमोर दिलेली मुलाखत ही सुद्धा सर्वांनी पाहीली.

Advertisement

दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्यास इच्छुक असलेल्या सदाभाऊ खोत आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत. आपल्याच परिसरात बोलताना सदाभाऊंचा ग्रामिण बाज पुन्हा समोर आला. आपण सत्तेवर असताना काय काय अनुभव घेतला याचं उदाहरण दाखल पुरावा देत स्वतावरही विनोद करायला ते विसरले नाहीत.

यावेळी त्यांनी मंत्रीपद गेल्याने आपली खदखद प्रथमच व्यक्त केली तेही खुमारदार शैलीत. सुरवातीलाच त्यांनी बोलताना "बोलायला हयगय करायची न्हाई... मी कायमच बोलायचो हातकणंगले मीच लढवणार...मीच न्हाई म्हटलं तर माणसं माझ्यासोबत ऱ्हातील का ? त्यामुळे बोलायला हयगय करायची न्हाई. " असे मिष्किलपणे सदाभाऊ खोतांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “सत्ता वाईट असते...मी भोगली आहे...माझी गाडी आल्यावर प्रत्येक तालुक्यात मागून दहा- बारा गाड्या लागायच्या....एक किलोमीटरपर्यंत गाड्यांची रांग दिसायची. मला वाटायचं, आता माझं वजन खूपच वाढायला लागलंय. मात्र मंत्रीपद गेलं तसं गाडी पण गेली... गाडीवाला पण गेला...मी मात्र एकटाच राहिलो. मंत्रीपदाच्या काळात मला रात्री एक- एक वाजता फोन यायचा...आता मी त्यांना फोन केला तरी उचलत नाहीत....हे खूप वाईट!” असं बोलून त्यांनी आपली खंत जाहीररित्या व्यक्त केली.

मंत्रीपद गेल्यावर आलेले वाईट अनुभव सांगताना ते म्हणाले, २०१९ ला दुसरं (महाविकास आघाडी) सरकार आलं...मी मुंबईवरून बॅग घेऊन गावाकडं आलो...गावात आल्यावर नेहमीप्रमाणे खुर्ची टाकून बसलो. एखाद्या गाडीची लाईट चमकली की, मला वाटायचं कुणीतरी माझ्याकडं आलंय...पण त्यानंतर कुणीही गाडीची काचही खाली केली नाही...मला आलेला हा अनुभव खूप वाईट होता....सत्ता असली की सगळे मागे पळत असतात."असेही त्यांनी म्हटलं आहे.

“मंत्री झाल्यावर लोकं घरी आलो की, त्यांना लसणाची चटणी, दही, ठेचा आणि भाकरी खाऊ घालायचो....लोकही म्हणायचे, तुमच्यासारखा मंत्री आम्ही कधी बघितला नाही...माझ्या बंगल्यात मी हॉलमध्ये झोपायचो...पण माझ्या घरात कार्यकर्त्यांचा राबता असायचा. बंगल्यावरचे स्वयंपाकी थकून जायचे, पण प्रत्येक कार्यकर्त्याला खाल्ल्याशिवाय सोडायचो नाही. कारण हेच कार्यकर्ते पुढे कामाला येणार असं वाटायचं...पण सत्ता गेली अन् कुणीच काही कामाला आलं नाही....साधं चहा प्यायलाही कुणी बोलवंत नाही” असं वास्तव त्यांनी सांगितलं.

....तर दारिद्र रेषेखालीच असतो
या भाषणात सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टी यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या टिका केली. यावेळी बोलताना त्यांनी "मी आता जुन्या शेतकरी नेत्याचे नाव इथं घेणार नाही...पण त्यांनी मला कधीही मंत्री किंवा आमदार होऊ दिलं नाही. २०१४ साली आम्ही एनडीएत असताना दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत मी माझ्या मंत्रिपदाबाबत बोललो. त्यावेळी अमित शाह यांनी राजू शेट्टींनी शेतकरी संघटनेतून कुणालाही मंत्रीपद न देण्यास सांगितल्याचा खुलासा केला. ते ऐकुण मला धक्काच बसला. मात्र त्यानंतर मी कसा बसा त्या संघटनेतून निसटलो आणि थेट मंत्री झालो...तिथे असतो तर माझं नाव कायम दारिद्र रेषेखालीच राहिलं असतं."असंही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.