Kolhapur News : 'गो रक्षका'च्या आडून गुंडगिरी?, सदाभाऊ खोतांचा आक्रमक पवित्रा
घटना एक ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली होती
By : सुरेश पाटील
पुलाची शिरोली : सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरकडे विक्रीसाठी निघालेल्या गायींच्या टेंम्पो अडवून पैशाची मागणी करणाऱ्यांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गो रक्षकाच्या आडून गुंडगिरी करणाऱ्यावर पोलिस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण येथून सचिन खोत हे आपल्या टेंम्पोतून चार गाई विक्रीसाठी कोल्हापूरकडे घेऊन निघाले होते. टोप येथील एका शोरूमसमोर प्रणव प्रकाश सोनुले (रा. पेठ वडगाव) याने हा टेम्पो अडवला. या गाई गो हत्या करण्यासाठी नेत आहात म्हणून शिवीगाळ केला आणि दीड लाखांची मागणी केली, अशी फिर्याद अमोल पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
घटना एक ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली होती. दरम्यान, दोन्ही गटातील कार्यकर्ते एकाच पक्षाचे आहेत. त्यांच्यातील व्यापार, व्यवहारातील देवघेवीवरून हा प्रकार घडला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. रेठरे व पेठवडगाव व्यापाऱ्यांकडून ही जनावरे बंगळूरु येथे पाठवली जात असल्याची माहिती समजत आहे.
दरम्यान, याबाबत माजी कृषिमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट शिरोली पोलीस ठाण्यात येऊन संबंधित आरोपी प्रणव सोनुले यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे करत आहेत.
सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली. यावेळी ते म्हणाले, गाई विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून रोखीने पैसे घेतले जात आहेत. काही लोकांनी ऑनलाईन पैसे देऊन हे केवळ भितीने तक्रार देण्यास तयार नाहीत. त्यामुळे गोरक्षकाच्या नावाखाली बोगसगिरी करत असलेल्यांवर पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी.