For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदाभाऊंनी वाजविला ढोल, पडळकरांनी धरला लेझीमचा ठेका; सांगलीत ‘डीजे संस्कृती संपवूया, पारंपरिक संस्कृती जपूया’चा नारा

02:40 PM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
सदाभाऊंनी वाजविला ढोल  पडळकरांनी धरला लेझीमचा ठेका  सांगलीत ‘डीजे संस्कृती संपवूया  पारंपरिक संस्कृती जपूया’चा नारा
Advertisement

सांगली / प्रतिनिधी : डीजेच्या वाढत्या वापराला विरोध करत पारंपरिक वाद्यसंस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देण्यासाठी सांगलीत आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर उतरले. ‘डीजे संस्कृती संपवूया, पारंपरिक संस्कृती जपूया’ असा नारा देत आगामी गणेशोत्सवात डीजेऐवजी ढोल, ताशा, लेझीम आणि अन्य पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Advertisement

विद्यानंद बापट यांनी डीजे बंदीची मागणी केल्यानंतर सांगलीतील मारुती चौकात पारंपरिक वाद्यांच्या समर्थनार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल, ताशा, लेझीम यांसह विविध पारंपरिक वाद्यांचे पूजन करण्यात आले.

बैठकीनंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वतः ढोल हाती घेत वादन केले. त्यांच्या जोडीला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लेझीमचा ठेका धरत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. ढोल-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या तालामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत असून, गणेशोत्सवातील पारंपरिक वाद्यांची समृद्ध परंपरा जपणे गरजेचे आहे, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. उत्सवातील जल्लोष कायम ठेवतानाच त्याला पारंपरिक संस्कृतीची जोड देण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

आगामी गणेशोत्सवात गणेश मंडळांनी डीजेऐवजी ढोल, ताशा, लेझीम आणि इतर पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले. पारंपरिक वाद्यांमधून निर्माण होणारा उत्साह आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या उपक्रमात भाजपाचे युवा नेते पृथ्वीराज पवार यांच्यासह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, विविध गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या तालात पारंपरिक वाद्यसंस्कृती जपण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Advertisement
Tags :

.