Kolhapur Crime News: अर्जुनवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला
तब्बल दहा दिवसांनी आढळला मृतदेह
नेसरी: अर्जुनवाडी येथील सचिन सुरेश मंडलिक हा चाळीस वर्षीय तरुण तब्बल दहा दिवसापासून बेपत्ता होता. अखेर तब्बल दहा दिवसांनी रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अर्जुनवाडी गावच्या हद्दीतीलच आपटेवाडी नावच्या शेतात सचिनचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक लॅब व डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरु होता. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सपोनि आबा गाढवे यांनी भेट देऊन माहिती घेत मृतदेहाची पाहणी केली. याबाबतची अधिक माहिती अशी, सचिन मंडलिक हा शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून न सांगता बाहेर पडला होता. तो घरी परतलाच नसल्याने सचिनचा भाऊ सुधाकर मंडलिक याने सचिन बेपत्ता झाल्याची फिर्याद नेसरी पोलिसात दिली होती. तर सचिन बेपत्ता झाल्याची बातमी गावात कळताच त्याच्या शोधासाठी गावकऱ्यांसह मित्रपरिवार व नातेवाईकांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते.
शोधासाठी त्याच्या फोटोसहित परिसरातील गावात बॅनर्स लावून शोध मोहीम राबवली होती. सचिनचे नातेवाईक, मित्रांसह गावकऱ्यांनी त्याची शोध मोहीम राबवली होती. अर्जुनवाडी गावासह अन्य सभोवतालच्या गावातूनही विहिर, तलाब व शेतवडीच्या ठिकाणी त्याच्या शोधासाठी सर्वांनी रात्रंदिवस काम पाहिले होते. मात्र त्याला अपयश आले होते. पिग्मी एजंट असलेला सचिन अचानक गायब झाल्यामुळे मंडलिक कुटुंबांसह गावकरी चिंतेत सापडले होते.
शोधमोहिमेत गावकऱ्यांचा सहभाग वारकरी असलेला सचिन गावात सर्वाच्या आवडीचा होता. कुठेही भजन कीर्तन असल्यास सचिन त्याठिकाणी सामील व्हायचा. तसेच गावच्या सर्व कार्यात त्याचा हिरीरीने सहभाग ठरलेला असायचा. तो बेपत्ता झाल्याची बातमी समजल्यापासून गावकऱ्यांनी त्याच्या शोध मोहिमेसाठी कोणतीच कसर सोडली नव्हती. तर अनेक तरुण दुचाकी घेऊन तसेच सोशल मीडियावरुनही त्याच्या शोधासाठी प्रयत्न करत होते. मात्र हे सारे प्रयत्न असफल होऊन तब्बल दहा दिवसानंतर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सचिनचा मृतदेह आपटेवाडी नावाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.