For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सचिन, सागर, अरुंधती उपांत्यपूर्व फेरीत

06:05 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सचिन  सागर  अरुंधती उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

स्ट्रँडजा ममोरियल मुष्टियुद्ध स्पर्धा : मनीषा, वंशज पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ सोफिया, बल्गेरिया

माजी युवा वर्ल्ड चॅम्पियन सचिन व राष्ट्रकुल रौप्यविजेता सागर यांनी 75 व्या स्टँडजा मेमोरियला बॉक्सिंग स्पर्धेत आपापल्या वजन गटातून उपांत्यपूवं फेरी गाठली.

Advertisement

57 किलो वजन गटाच्या लढतीत सचिनने उज्बेकच्या फेझोव्ह खुदेयनाझारचा पराभव केला. दोन्ही मुष्टियोद्ध्यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पण फेझोव्हने पहिल्या फेरीत थोडेफार वर्चस्व मिळविले. दुसऱ्या फेरीत मात्र सचिन बराच बदललेला दिसला. त्याने जलद हालचाली करीत फेझोव्हवर जोरदार आक्रमण करीत अचूक ठोसे लगावले. तिसऱ्या फेरीत हाच जोम कायम राखत अखेर 3-2 अशी आघाडी घेत विजय साकार केला. त्याची उपांत्यपूर्व लढत जॉर्जियाच्या कॅपानेझ जिऑर्जीशी शुक्रवारी होईल.

92 किलोवरील गटात लिथुआनियाच्या जॅझेव्हिसियस जोनासवर 5-0 अशी एकतर्फी मात केली. सागरने या लढतीत प्रारंभापासूनच पूर्ण वर्चस्व राखले होते. सतत आक्रमण करीत त्याने ही लढत एकतर्फी जिंकली. त्याची उपांत्यपूर्व लढत उझ्बेकच्या झोकिरोव्ह जाखोनगिरशी होईल.

अन्य लढतीत वंशजला 63 किलो वजन गटाच्या लढतीत इराणच्या हबिबिनेझाद अलीकडून संघर्षानंतर पराभव स्वीकारावा लागला. दोघांनी सावध खेळावरच भर देत प्रतिआक्रमण करण्याचा प्रयत्न करीत होते. वंशजने काही वेळ वर्चस्व गाजविले पण शेवटी निकाल त्याच्या बाजूने लागला नाही. ही लढत त्याला 2-3 अशा फरकाने हार पत्करावी लागली.

तत्पूर्वी, अरुंधती चौधरीने महिलांच्या 66 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरी गाठताना फ्रान्सच्या सोनविको एमिलीचा 4-1 असा पराभव केला. तिची पुढील लढत सर्बियाच्या मॅटोविच मिलेनाशी होईल. 60 किलो वजन गटात मनीषाला फ्रान्सच्या झिदानी अमिनाकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. युरोपमधील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत 30 देशांतील 300 हून अधिक मुष्टियोद्ध्यांनी भाग घेतला आहे.

लवलिना बोर्गोहेन अपात्र

सोमवारी भारतीय ऑलिम्पिक कांस्यविजेती लवलिना बोर्गोहेनला मात्र धक्कादायकरित्या अपात्र ठरून स्पर्धेबाहेर पडावे लागले. 75 किलो वजन गटातील तिची ही लढत आयर्लंडच्या ओरुर्के एओफविरुद्ध झाली. या लढतीत तिने प्रतिस्पर्धीला बराच वेळ जखडून ठेवल्यामुळे तिला तिसऱ्या रेफरीनी अपात्र ठरवून एओफला विजयी घोषित केले. पहिले दोन राऊंड लवलिनाने जिंकले होते. पण नंतर तिला उदासिन खेळामुळे दोनदा ताकीद दिल्याने तिचे गुण कमी झाले आणि तिसऱ्यांदा समज मिळाल्यानंतर तिला अपात्र ठरविण्यात आले.

Advertisement
Tags :

.