लोकायुक्त कारवाईनंतर सचिन मांडेदार कार्यालयात गैरहजर
लोकायुक्त चौकशीमुळे पदभार सोपविला एफडीएकडे
प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण उपनेंदणी कार्यालयातील एफडीए तथा प्रभारी उपनोंदणी अधिकारी सचिन मांडेदार यांच्यावर शुक्रवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यामागे आता चौकशीचा ससेमिरा लागला असून शनिवारी ते कार्यालयात गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्याकडील जबाबदारी प्रथम दर्जा साहाय्यक (एफडीए) सुरेश भागाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर दक्षिण उपनोंदणी कार्यालयातील कामकाज भागाई यांनी हाताळले.
उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त माया जमविल्याच्या आरोपावरून शुक्रवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रभारी दक्षिण उपनोंदणी अधिकाऱ्यासह रायबाग तालुक्यातील निलजी येथील पशुवैद्यकीय निरीक्षकावर धाड टाकली होती. त्यावेळी दोघांकडे मोठी माया असल्याचे स्पष्ट झाले. दक्षिण उपनोंदणी कार्यालयात कार्यरत असलेले उपनोंदणी अधिकारी आनंद बदनीकाई यांच्या जागी गेल्या काही दिवसांपासून एफडीए सचिन मांडेदार हे प्रभारी म्हणून काम पहात होते. मात्र त्यांनी उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक माया जमविल्याच्या तक्रारी लोकायुक्त पोलिसांकडे आल्या होत्या.
त्यानुसार त्यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी शुक्रवारी एकाचवेळी पहाटे छापेमारी करण्यात आली. त्यावेळी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळून आली. त्यामुळे त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
शनिवारी सचिन मांडेदार हे उपनोंदणी कार्यालयात गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत उपनोंदणी कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी कार्यालयातील एफडीए सुरेश भागाई यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे भागाई यांनी शनिवारी दिवसभर कार्यालयातील कामकाज हाताळले. एकंदरीत एफडीए सचिन मांडेदार आता कार्यालयात कधी रुजू होणार याबाबत उपनोंदणी कार्यालयात चर्चा सुरू आहे.