बीडचा हुकमी एक्का - सचिन धस! शैलीदार फलंदाजीने गाजवला युवा विश्वचषक
सचिनच्या यशात वडीलांचे मोठे योगदान
संग्राम काटकर कोल्हापूर
भारतीय क्रिकेट आणि विशेषत: सचिन या नावामध्ये एक खास आणि कधीही न संपणारं असं घट्ट नातं आहे. क्रिकेटमध्ये दुसरा सचिन तेंडुलकर होणे नाही, हे जरी खरं असलं, तरी सध्या एका नव्या सचिनच्या नावाचा गाजावाजा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात होतो आहे. हा सचिन म्हणजे युवा विश्वचषक स्पर्धेत भारताला फायनलमध्ये पोहोचण्यात महत्वाची भूमिका बजावणारा बीड जिल्ह्यातला शैलीदार फलंदाज सचिन संजय धस. दक्षिण आफ्रिकेला सेमिफायनलमध्ये त्यांच्याच देशात धूळ चारत भारतानं अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली. या विजयात कर्णधार उदय सहारनच्या साथीनं सर्वांत महत्त्वाची भूमिका पार पाडली सचिन धसनं. आफ्रिकेविरोधात भारताची अवस्था 32 धावांवर 4 विकेट अशी झाली होती. पण नंतर आलेल्या सचिननं 95 चेंडूंमध्ये तडाखेबाज 96 धावांची खेळी करत अवघड वाटणारा विजय भारतासाठी अक्षरश: खेचून आणला. पॅकर्स क्लबच्यावतीने आयोजित केलेल्या निमंत्रीताच्या टी 20 क्रिकेट स्पर्धानिमित्त सचिन कोल्हापुरमध्ये आला असता 'तरुण भारत'संवादच्या प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला.
बीडच्या सुपरस्टारच्या नावामागच खर कारण?
सारणी सांगवी (ता. केज, जि. बीड) या गावी 2005 साली जन्मलेल्या सचिन धसच्या क्रिकेटमधील मोठ्या यशामागे वडील संजय धस यांची प्रेरणा दडली आहे. सचिनचे वडील संजय धस हे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते आहे. यामुळे त्यांनी मुलाचे नाव सचिन ठेवले. सचिन या नावातच एवढी अफाट शक्ती आहे की, जणू त्यांचा आशीर्वाद या नावाच्या रुपानं सचिनला मिळाला आणि त्यामुळे तो ही कामगिरी करू शकला, असं संजय धस सांगतात. सचिन अवघ्या पाच वर्षाचा होता. मात्र हेच वय खेळाडू बनवण्याचे आहे, हे ध्यानात घेऊन वडील संजय हे सचिनला मैदानात नेऊन फलंदाजी कशी करायची हे शिकवायचे. कालांतराने वडीलांनी सचिनला प्रशिक्षक अजहर शेख यांच्या आदर्श क्रिकेट अॅकॅडमीत सरावासाठी दाखल केले. अॅकॅडमीतील प्रशिक्षणामुळे सामन्यात कधी घणाघाती व कधी संयमी फलंदाजी करायची याची त्याला जाण आली.
पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धांनी दिला टर्निंग पाईंट
सचिनमधील क्रिकेट कौशल्याला खऱ्या अर्थाने वाव मिळाला म्हणजे तो पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धांमधून. 14, 16 व 19 वर्षाखालील मुलांच्या गटात झालेल्या या स्पर्धांमध्ये सचिनने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) निवडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र संघातून प्रतिनिधीत्व केले. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात झालेल्या पश्चिम विभागीय तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धांमध्ये 3 वर्षे प्रतिनिधीत्व करताना त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतके ठोकली होती. 16 वर्षाखालील मुलांच्या महाराष्ट्र संघातून दोन वर्षे प्रतिनिधीत्व करत त्याने 4 शतके व अर्धशतके ठोकली आहेत. याशिवाय, 19 वर्षाखालील मुलांच्या चार दिवसीय स्पर्धेतही महाराष्ट्र संघातून 3 वर्षे खेळताना त्याने 3 शतके आणि 14 अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम केला. या कामगिरीमुळेच त्याला चॅलेंजर ट्रॉफी 19 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधी चालून आली.
चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारताच्या विविध संघात मिळाले स्थान
सचिनला त्याच्या क्रिकेट करिअरमधील पहिली चॅलेंजर ट्रॉफी 19 वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारत ड संघातून खेळण्याची संधी मिळाली. इतकेच नव्हे तर फलंदाजीतील कामगिरीचा मान राखत त्यांच्यावर संघाच्या कर्णधार पदाची धुराही सोपवली गेली होती. अहमदाबाद (गुजरात) येथे 2021-22 साली झालेल्या चॅलेंजर ट्राफीत भारत ड संघातून खेळताना सचिनला फलंदाजीतून फारशी मजल मारता आली नाही. मात्र त्याने स्पर्धेत आखलेल्या रणनितीच्या जोरावर भारत ड संघाला चॅलेजर ट्रॉफी जिंकता आली. या कामगिरीमुळे सचिनला भारत क संघात स्थान मिळाले. या संघातून खेळताना गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या चॅलेंजर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात चौफेर फटकेबाजी करत 170 आणि दुसऱ्या सामन्यात 50 धावा ठोकल्या. याही कामगिरीमुळे सचिनला विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे भारत, बांग्लादेश व इंग्लंड या तीन देशांमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत भारतीय ब संघातून खेळण्याची संधी मिळाली. याही संधीचा सोनं करून दाखवत त्याने भारत अ संघाविऊद्ध सामन्यात शानदार 149 आणि इंग्लंड विऊद्धच्या सामन्यात नाबाद 130 धावांची पारी खेळली. बांग्लादेशविऊद्धच्या सामन्यातही त्याने नाबाद 59 धावा ठोकल्या. याही कामगिरीमुळे त्याला गतवर्षी दुबईत झालेल्या एशिया कप वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी 19 वर्षाखालील मुलांच्या भारत संघात स्थान मिळाले. आपल्या स्थानाला न्याय देत त्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात नाबाद 55 धावा ठोकत ट्रॅग्युलर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठीच्या भारत 19 वर्षाखालील मुलांच्या संघात स्थान मिळवले. साऊथ आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत भारत, अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका असे तीन संघ होते. यापैकी आफ्रिकेविऊद्धच्या सामन्यात सचिनने अर्धशतक मारत गतमहिन्यापूर्वी आफ्रिकेतच झालेल्या विश्वचषक 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले.
युवा विश्वचषकाने दिली नवी ओळख
युवा विश्वचषक स्पर्धेत सचिनची क्रिकेटमधील प्रतिमा अधिक उजळली. त्याने भारतीय संघातून नेपाळच्या विऊद्ध सामन्यात खेळताना शतक ठोकण्याची कामगिरी तर केली. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारत संघासमोर 245 धावांचा लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य गाठताना भारताची 4 बाद 31 धावा अशी बिकट स्थिती झाली होती. अशा स्थितीतच कर्णधार उदय सहारननेच्या साथीने सचिनने खेळपट्टीवर टिकून 96 धावा केल्या. या महत्वपूर्ण धावांमुळे भारताचा सामन्यात विजय होऊन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश झाला."
वडिलांचे योगदान मोलाचे
मी क्रिकेटर व्हावे म्हणून वडील संजय धस यांनी उधार पैसे घेऊन माझ्यासाठी खेळपट्टी बनवली. बीडमधील पाण्याच्या संकटातून मार्ग काढत ते दोन-तीन दिवसातून एकदा पदरमोड कऊन खेळपट्टीसाठी टँकर मागवायचे. त्यांनी असे केले नसते तर कदाचित मी क्रिकेटर बनलो नसतो. प्रशिक्षक अजहर शेख यांनी मला मैदानात सर्व बाजूंना फटकेबाजी कशी करायची याचा उत्तम सराव करवून घेतला. हा सराव मला भारत 19 वर्षाखालील मुलांच्या संघात मिळवण्यासाठी कामी आला. भारत संघाचे प्रशिक्षक व भारतीय क्रिकेट संघाचे माजी ऑलराऊंडर खेळाडू ऋषिकेश कानिटकर आणि भारतीय संघाचे प्रख्यात माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी दिलेले मार्गदर्शन मी कदापीही विसरू शकत नाही.
युवा क्रिकेटपटू, सचिन धस