For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साबालेन्का, व्हेरेव्ह, स्विटोलिना उपांत्य फेरीत

06:56 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
साबालेन्का  व्हेरेव्ह  स्विटोलिना उपांत्य फेरीत
Advertisement

कोको गॉफ, मॅडिसन कीज यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

अग्रमानांकित आर्यना साबालेन्का, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, एलिना स्विटोलिना यांनी ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. प्रचंड उष्मा असल्याने बरेचसे सामने छताखाली खेळविण्यात आले.

Advertisement

साबालेन्काने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत अमेरिकेच्या 18 वर्षीय इव्हा जोविचचा 6-3, 6-0 असा सहज पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. साबालेन्काने गेल्या वर्षी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते आणि चार वर्षांत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. तिने 2023, 2024 मध्ये सलग दोनदा जेतेपद मिळविले तर मागील वर्षी मॅडिसन कीजने तिला अंतिम फेरीत हरविले होते. जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असणाऱ्या एलिना स्विटोलिनाने जागतिक तिसऱ्या मानांकित कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. डब्ल्यूटीए टूरवरील 19 अजिंक्यपदे मिळविणाऱ्या स्विटोलिनाला अद्याप एकदाही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. यावेळी ती कसर भरून काढण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला साबालेन्काशी होणार आहे. स्विटोलिनाने गॉफवर 6-1, 6-2 अशी एकतफा मात केली. तिचा हा सलग दहावा विजय आहे. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची स्विटोलिनाची ही चौथी तर ऑस्ट्रेलियन ओपनमधील पहिलीच वेळ आहे. विम्बल्डनमध्ये ती दोनदा तर यूएस ओपनमध्ये एकदा उपांत्य फेरीत पराभूत झाली आहे. या विजयानंतर स्विटोलिना ऑक्टोबर 2021 नंतर प्रथमच डब्ल्यूटीए मानांकनात पुन्हा टॉप टेनमध्ये पोहोचली आहे. मागील वर्षीची विजेती मॅडिसन कीज सोमवारी जेसिका पेगुलाकडून पराभूत झाली असल्याने साबालेन्काला जेतेपदाची चांगली संधी आहे.

रॉड लेव्हर एरिनावर छताखाली खेळण्याचा लाभ उठवत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हेने 20 वर्षीय लर्नर तिएनवर 6-3, 6-7 (5-7), 6-1, 7-6 (7-3) अशी मात केली. तिसऱ्या मानांकित व्हेरेव्हला ही लढत जिंकण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. गेल्या वर्षी तो या स्पर्धेचा उपविजेता होता. दहाव्यांदा त्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना 24 बिनतोड सर्व्हिस केल्या आणि फक्त एकदा दुहेरी चूक केली. निर्णायक टायब्रेकरमध्ये त्याला सहा मॅचपॉईंट्स मिळाले होते.

त्याआधी जेनिस सिनरने उपांत्यपूर्व फेरी गाठताना आपल्याच देशाच्या लुसियानो दार्देरीचा 6-1, 6-3, 7-6 (7-2) असा पराभव करीत चौथ्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून डिमिट्रोव्ह, निशिकोरी, सित्सिपस यांच्याशी बरोबरी केली.

स्वायटेक, रायबाकिना, पेगुला यांची आगेकूच

तत्पूर्वी, इगा स्वायटेक, एलेना रायबाकिना, अमांदा अॅनिसिमोव्हा, जेसिका पेगुला यांनी महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. जागतिक द्वितीय मानांकित इगा स्वायटेकने मॅडिसन इंग्लिसला 6-0, 6-3 असे नमविले. तिने सहा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असली तरी ऑस्ट्रेलियन स्पर्धा तिला एकदाही जिंकता आलेली नाही. 2022 मध्ये तिने उपांत्य फेरी गाठत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. चौथी मानांकित अॅनिसिमोव्हाने चीनच्या वांग झिनयूवर 7-6 (7-4), 6-4 अशी संघर्षपूर्ण लढतीत मात केली तर पाचव्या मानांकित एलेना रायबाकिनाने 21 व्या मानांकित एलिस मर्टेन्सचा 6-1, 6-3 असा धुव्वा उडवित आगेकूच केली. सहाव्या मानांकित जेसिका पेगुलानेही आक्रमक खेळ करीत विद्यमान विजेत्या मॅडिसन कीजचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. सव्वा तास ही लढत रंगली होती.

युकी भांब्री-गोरान्सन तिसऱ्या फेरीत पराभूत

पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांब्री व त्याचा स्विडिश साथीदार आंद्रे गोरान्सन यांना तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. युकीच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. दहावे मानांकन मिळालेल्या युकी-गोरान्सन यांना ब्राझीलच्या ओरलँडो लुझ व राफाएल मातोस यांनी 7-6 (9-7), 6-3 असे हरविले. ही लढत पावणेदोन सात रंगली होती.

Advertisement
Tags :

.