ब्रिस्बेन स्पर्धेत साबालेंका अजिंक्य
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
बेलारुसची टॉप सिडेड महिला टेनिसपटू आर्यना साबालेंकाने डब्ल्यूटीए टूरवरील ब्रिस्बेन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना कोस्ट्युकचा अंतिम फेरीत पराभव केला. साबालेंकाने ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली आहे.
ब्रिस्बेनच्या टेनिस स्पर्धेत साबालेंकाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली रविवारी येथे झालेल्या महिला एकेरीच्यला अंतिम सामन्यात साबालेंकाने कोस्ट्युकचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये 70 मिनिटांच्या कालावधीत फडशा पाडत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. 18 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रॅडस्लॅम स्पर्धेसाठी साबालेंका आता सज्ज झाली आहे.
या सामन्यानंतर टेनिस कोर्टवरुन बाहेर जात असताना साबालेंका आणि युक्रेनची कोस्ट्युक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. 2023 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत सामना संपल्यानंतर कोस्ट्युकने साबालेंकाशी हस्तांदोलन करण्यास नकार दर्शविला होता. या वर्तवणुकीचे पडसाद ब्रिस्बेनच्या टेनिस स्पर्धेतही उमटले. पंचांनी मध्यस्थी करुन यावर सामोपचाराने पडदा टाकला. आता या स्पर्धेत पुरूषांच्या विभागात रशियाचा टॉप सिडेड डॅनिल मेदव्हेदेव आणि जपानचा नाकाशिमा यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.