ब्रिस्बेन स्पर्धेत साबालेंका विजेती
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
2025 च्या टेनिस हंगामातील येथे रविवारी झालेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या एरिना साबालेंकाने रशियाच्या कुडेरमेटोव्हाचा पराभव करत एकेरीचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत पुरुष गटातील जेतेपद झेकच्या लिहेकाने पटकाविले.
साबालेंकाने अंतिम सामन्यात पोलिना कुडेरमेटोव्हाचा 4-6, 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. साबालेंकाच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे 18 वे विजेतेपद आहे. या जेतेपदानंतर आता 26 वर्षीय साबालेंका ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. ब्रिस्बेन स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद झेकच्या जेरी लिहेकाने मिळविले. अंतिम सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी अमेरिकेचा रिले ओपेलकाने दुखापतीमुळे पहिला सेट सुरु असतानाच माघार घेतल्याने लिहेकाला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. ओपेलकाच्या मनगटाला ही दुखापत झाली होती. एटीपी टूरवरील लिहेकाचे हे दुसरे विजेतेपद आहे.