साबालेन्का, नेव्हारो, टायफो, फ्रिट्झ उपांत्य फेरीत
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : पॉला बेडोसा, झेंग
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत आर्यना साबालेन्का, एम्मा नेव्हारो, टेलर फ्रिट्झ, फ्रान्सेस टायफो यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
अमेरिकेच्या 13 व्या मानांकित एम्मा नेव्हारोने ग्रँडस्लॅमची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली असून तिने पॉला बेडोसाचा 6-2, 7-5 असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये ती पिछाडीवर पडली होती. पण जोरदार मुसंडी मारत तिने सलग सहा गेम्स जिंकत सामनाही जिंकला. याआधीही नेव्हारोने विद्यमान विजेत्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आणले होते. तिची उपांत्य लढत द्वितीय मानांकित आर्यना साबालेन्काशी होईल. साबालेन्का कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी तिला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
किनवेन पराभूत
साबालेन्काने चीनच्या सातव्या मानांकित व ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या झेंग किनवेनचे आव्हान संपुष्टात आणताना 6-1, 6-2 असा सहज विजय मिळविला. यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीतही या दोघींची गाठ पडली होती आणि त्यावेळीही साबालेन्काने किनवेनवर मात करून जेतेपद पटकावले होते. मागील वर्षीही साबालेन्काने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. निवृत्त झालेला स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर हा सामना पाहण्यासाठी स्टँड्समध्ये उपस्थित होता. पॉवरफुल खेळाचे प्रदर्शन करीत साबालेन्काने सलग चौथ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र गेल्यावर्षी तिला अंतिम फेरीत कोको गॉफने हरविल्याने उपविजेतेपद मिळाले होते. जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया व अमेरिकन ओपन दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. साबालेन्का त्याची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे.
फ्रिट्झ, टायफो उपांत्य लढत
पुरुष एकेरीत 12 व्या मानांकित अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली असून त्याने 2020 चा चॅम्पियन चौथ्या मानांकति अलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात आणताना 7-6 (7-2), 3-6, 6-4, 7-6 (7-3) असा विजय मिळविला. यापूर्वी फ्रिट्झला उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नव्हती. त्याला चार वेळा या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. यावर्षी झालेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीतही फ्रिट्झने व्हेरेव्हला हरविले होते.
अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून त्याने बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हवर 6-3, 6-7 (5-7), 6-3, 4-1 अशी आघाडी घेतली असताना डिमिट्रोव्हने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे टायफो व फ्रिट्झ या दोन अमेरिकन खेळाडूंत उपांत्य लढत होणार आहे. 2005 नंतर प्रथमच या स्पर्धेत दोन अमेरिकन खेळाडू उपांत्य फेरीत खेळणार आहेत. त्यामुळे एक अमेरिकन खेळाडू अंतिम फेरी गाठणार हे निश्चित आहे. 2005 मध्ये आंद्रे अॅगास्सीने रॉबी गिनेप्रीचा पाच सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. फ्रिट्झ व टायफो यांच्यात आतापर्यंत सातवेळा गाठ पडली असून फ्रिट्झने 6 तर टायफोने एक लढत जिंकली आहे.