पाओलिनीला हरवून साबालेंका उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ रियाद (सौदी अरेबिया)
येथे सुरु असलेल्या 2024 च्या टेनिस हंगामातील महिलांच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत 26 वर्षीय आणि टॉप सिडेड आर्यना साबालेंकाने इटलीच्या पाओलिनीचा पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
पर्पल गटातील राऊंड रॉबिन फेरीत टॉप सिडेड साबालेंकाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. सोमवारी झालेल्या सामन्यात तिने इटलीच्या चौथ्या मानांकित जस्मिन पाओलिनीचा 6-3, 7-5 असा पराभव केला. 2024 च्या टेनिस हंगामाअखेर साबालेंका मानांकनातील आपले अग्रस्थान कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पर्पल गटातील बुधवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात साबालेंकाने इलिना रायबाकिना विजय मिळविणे गरजेचे आहे. बेलारुसच्या साबालेंकाने या स्पर्धेत यापूर्वी चीनच्या झेंग क्विनवेन समवेत संयुक्त आघाडी मिळवली आहे. पण त्यानंतर साबालेंकाने रायबाकिनाचा सलामीच्या सामन्यात 7-6 (7-4), 3-6, 6-1 असा पराभव करुन आपले पर्पल गटातील अग्रस्थान निश्चित केले होते. मात्र आता बुधवारच्या शेवटच्या सामन्यानंतर या गटातील खेळाडूंचे क्रमांक निश्चित होतील. पण साबालेंकाने या स्पर्धेत सर्व प्रथम उपांत्य फेरी गाठली आहे. साबालेंकाने 2024 च्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच तिने डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकताना चीनच्या झेंग क्विनवेनचा पराभव केला होता. झेंग आणि पाओलिनी यांनी प्रत्येकी समान 1-1 सामना जिंकला आहे. आता या दोघींमध्ये बुधवारी महत्त्वाचा सामना खेळविला जाईल.
या स्पर्धेत पोलंडची इगा स्वायटेककडून साबालेंकाला कडवा प्रतिकार होऊ शकेल. 23 वर्षीय स्वायटेकचा पुढील सामना अमेरिकेच्या कोको गॉफशी होणार आहे. स्वायटेक या स्पर्धेतील विद्यमान विजेती असून तिला गॉफ विरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. तसेच साबालेंकाने आपले उर्वरित सामने गमविले तर मात्र स्वायटेकला 2024 च्या टेनिस हंगामाअखेर मानांकनातील अग्रस्थान मिळू शकेल. डब्ल्यूटीए फायनल्समध्ये पाठोपाठ दोन वर्षे उपांत्य फेरी गाठणारी साबालेंका ही पहिली टेनिसपटू आहे. असा पराक्रम अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने 2013-14 साली केला होता. या स्पर्धेत 22 वर्षीय झेंगने कझाकस्तानच्या रायबाकिनावर पहिला विजय मिळविला होता. पण त्यानंतर तिला साबालेंकाकडून हार पत्करावी लागली.