एस. एम. कृष्णा एक अष्टपैलू राजकारणी
विधानसभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वाहिली श्रद्धांजली
बेळगाव : माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा हे एक दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी नेते होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभेचे सदस्य म्हणून मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, सभाध्यक्ष, राज्यपाल म्हणूनही विविध पदे भूषवणारे कर्नाटकातील ते एकमेव राजकारणी होते, अशा शब्दात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा यांचे गुणगान केले. मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी एस. एम. कृष्णा यांच्या निधनाची माहिती सभागृहाला दिली. कृष्णा यांचे राजकीय जीवन सध्याच्या राजकीय नेत्यांना प्रेरणादायी आहे. ते एक आदर्श राजकीय नेते होते. जन्मत:च माणसाला नाव नसते. मात्र, श्वास असतो. श्वास जातो त्यावेळी माणसाचा मृत्यू होतो. मृत्यूनंतरही त्याच्या कर्तृत्वामुळे नाव शिल्लक राहते. केवळ कर्नाटकच नव्हे तर भारताच्या राजकीय इतिहासात एस. एम. कृष्णा हे नाव अजरामर असल्याचे सभाध्यक्षांनी सांगितले.
कृष्णा यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. ते महाराष्ट्राचे राज्यपालही होते. निजदमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची वेळ आली तर आपण मुंबईत एस. एम. कृष्णा यांची भेट घेतली. आपल्यासोबत डॉ. एच. सी. महादेवप्पा, सी. एम. इब्राहिम आदी नेते होते. कृष्णा यांच्याकडे काँग्रेस प्रवेशाबद्दल आपण सल्ला विचारला. ‘तुम्ही प्रवेश करा’, असे सांगत त्यांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतरच सतीश जारकीहोळी, आपण, डॉ. एच. सी. महादेवप्पा आदींसह आपल्यासोबत अनेक नेत्यांनी काँग्रेस प्रवेश केला, असे सांगत सिद्धरामय्या यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांची राजकीय वाटचाल प्रदीर्घ होती. सर्वांवर प्रेम करणारे, सर्वांचा आदर करणारे नेते अशीच त्यांची ओळख होती. ते कोणाचा द्वेष करीत नव्हते. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनने प्रसिद्ध चित्रपट अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले. त्यावेळी एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांसाठी तो काळ अत्यंत कठीण होता. ही कठीण परिस्थिती त्यांनी मोठ्या चतुराईने हाताळली. परिस्थिती हाताळण्याचे आव्हान पेलले. आंतरराष्ट्रीय पातळीवर बेंगळूरचा नावलौकिक करण्यात एस. एम. कृष्णा यांचे योगदान मोठे आहे. बेंगळूरला सिलिकॉन सिटी हे नाव माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कृष्णा यांच्या योगदानामुळेच मिळाले. ते एक सज्जन, मुत्सद्दी राजकारणी होते. तसेच ते एक दक्ष प्रशासकही होते. त्यांच्या जाण्याने कर्नाटकाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात सिद्धरामय्या यांनी कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी एस. एम. कृष्णा व आपल्या संबंधांना उजाळा देत प्रत्येक नेत्याचे मत आजमावूनच ते निर्णय घेत होते, असे सांगताना स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दुल करीम तेलगी प्रकरणाचा उल्लेख करीत हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यापूर्वी त्यांनी अन्य नेत्यांची मते कशी विचारात घेतली, याची माहिती दिली. तर मंत्री एच. के. पाटील यांनी उत्तर कर्नाटकातील अनेक विकास योजनांमध्ये एस. एम. कृष्णा यांचे योगदान किती होते, याची माहिती दिली. यावेळी बी. वाय. विजयेंद्र, मंत्री जमीर अहमद, टी. बी. जयचंद्र, सुरेश बाबू, अरग ज्ञानेंद्र, मंत्री के. एच. मुनियप्पा, जनार्दन रेड्डी, आप्पाजी नाडगौडा यांच्यासह अनेक नेत्यांनी विधानसभेत एस. एम. कृष्णा यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर एक मिनिट मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अफाट कर्तृत्वामुळे कृष्णा कीर्ती रूपाने सदैव स्मरणात राहणार : विरोधी पक्षनेते आर. अशोक
बेंगळूरकर कधी एस. एम. कृष्णा यांना विसरणार नाहीत. त्यांच्यामुळेच बेंगळूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळाली. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. डॉ. राजकुमार अपहरण प्रकरण, माजी मंत्री नागाप्पा अपहरण व हत्या प्रकरण, कावेरीच्या पाण्यासाठी पेटलेले आंदोलन आदी अनेक आव्हाने त्यांनी पेलली. केंगल हनुमंतय्या यांनी विधानसौध बांधले. तर एस. एम. कृष्णा यांनी विकाससौध उभारले. भाजप प्रवेशावेळी त्यांनी आपल्यासोबत मलाही दिल्लीला नेले होते. जन्मलेल्या प्रत्येकाचे मरण एक दिवस ठरलेलेच. मात्र, आपल्या अफाट कर्तृत्वामुळे कृष्णा कीर्ती रूपाने सदैव स्मरणात राहणार आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी कृष्णा यांचे स्मरण केले.