For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रायन विल्यम्सची भारताकडून पदार्पणातच गोलची नोंद

06:37 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
रायन विल्यम्सची भारताकडून पदार्पणातच गोलची नोंद
Advertisement

एएफसी आशियाई चषक पात्रता स्पर्धा : हाँगकाँगवर 2-1 ने विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ कोची

ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या रायन विल्यम्सने भारताकडून आपल्या पदार्पणाचा सामना स्वप्नवत बनवला. मंगळवारी येथे झालेल्या आशियाई चषक पात्रता फेरीतील एका बिनमहत्त्वाच्या सामन्यात, त्याने चौथ्याच मिनिटाला केलेल्या गोलमुळे यजमान भारताला हाँगकाँगवर 2-1 असा विजय मिळवता आला.

Advertisement

भारतासाठी दुसरा गोल 50 व्या मिनिटाला आकाश मिश्राने केला. हा त्याचाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलाच गोल होता. या गोलांच्या जोरावर, खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यातील आपला पहिला विजय नोंदवला. या खंडांतर्गत होणाऱ्या प्रतिष्ठित स्पर्धेच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या भारताने, आपला हा प्रवास पाच गुणांसह (एक विजय आणि दोन बरोबरी) आणि क गटात तळाच्या स्थानावर राहून संपवला. 65  व्या मिनिटाला एव्हर्टन कामार्गोने हाँगकाँगसाठी एक गोल करुन पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी 10 जून रोजी कोवलून येथे झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात भारताला हाँगकाँगकडून 0-1 ने पराभव स्वीकारावा लागला होता. याच दिवशी दिवसाच्या सुरूवातीला बांगलादेशचा 1-0 ने पराभव करणाऱ्या सिंगापूरने सहा सामन्यांतून 14 गुण मिळवत क गटात अव्वल स्थान पटकावले आणि 2027 च्या आशियाई चषकासाठी पात्रता निश्चित केली.

मनवीर सिंगने मध्यभागी दिलेल्या एका अप्रतिम आणि जमिनीलगतच्या पासवर, विल्यम्सने आपल्या उजव्या पायाने ‘फर्स्टटाईम’ (पहिल्याच स्पर्शात) फटका मारत चेंडू थेट गोलजाळीत धाडला. यामुळे कोची येथील मोठ्या प्रेक्षकसमुदायाला सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला जल्लोष करण्याची एक अविस्मरणीय संधी मिळाली. फिफाने विल्यम्सचे संघाशी सलग्नत्व बदलण्याचे (चेंज ऑफ असोसिएशन) प्रकरण मंजूर केल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. यामुळे 31 वर्षीय विंगर खेळाडूला भारताचे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याचा मार्ग मोकळा झाला. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी आयोजित भारताच्या सराव शिबिराचा तो भाग होता. परंतु कागदपत्रांची पूर्तता प्रलंबित असल्याने त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. हा त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदार्पणाचा सामना होता. कारण त्याने ऑस्ट्रेलियासाठी अद्याप कोणताही अधिकृत वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. त्याने ऑस्ट्रेलियाचे केवळ युवा स्तरावर प्रतिनिधीत्व केले होते. यामध्ये 2012 च्या एएफसी 19 वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धा आणि 2013 च्या फिफा 20 वर्षांखालील विश्व़चषकाचा समावेश आहे.

सध्या इंडियन सुपर लीग मधील बेंगळूर एफसी संघाकडून खेळणाऱ्या या अष्टपैलू आक्रमक खेळाडूने भारताकडून खेळण्यासाठी गेल्या वर्षीच आपला ऑस्ट्रेलियन पासपोर्ट सोडून दिला होता. 67 व्या मिनिटाला विल्यम्सला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले आणि त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली. त्यानंतर काहीच मिनिटांत मैदानावरच वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर अन्वर अलीलाही सामन्यातून बाहेर काढण्यात आले. भारतासाठी पदार्पण करणाऱ्या खेळाडूने केलेला हा सर्वात जलद गोल होता. यापूर्वीचा विक्रम 1963 मध्ये कोलंबो येथे ऑलिम्पिकपूर्व सामन्यात सिलोन (श्रीलंका) विरुद्ध के. अप्पलाराजू यांनी आणि 2005 मध्ये कराची येथे झालेल्या सॅफ कपमध्ये नेपाळविरुद्ध मेहताब होसेन यांनी सहाव्या मिनिटाला केलेल्या गोलचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.