रवांडाने केले दहशतवाद्याचे प्रत्यार्पण
अनेक कारवायांमध्ये सहभागी : भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अनेक दहशतवादी कृत्यांसाठी भारताला हवा असलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी सलमान रहमान खान हा भारताच्या हाती लागला आहे. त्यांने पलायन करुन रवांडा या देशात आश्रय घेतला होता. त्या देशाने त्याचे भारताला प्रत्यार्पण केले आहे. एनआयए, सीबीआय आणि इतर सुरक्षा संघटना त्यांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न चालविला होता. तो यशस्वी झाला आहे. काश्मीरमधील युवकांची दिशाभूल करुन त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये जाण्यास उद्युक्त करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. तसेच त्याने काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला होता. त्याच्यावर किमान 16 गुन्हे नेंद असून तो भारताला हवा होता. गेल्या 2 ऑक्टोबरला त्याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस लागू केली होती. तो रवांडा येथे असल्याचे समजल्यानंतर सीबीआयने त्या देशाच्या न्यायालयात जाऊन प्रत्यार्पणाचा अर्ज सादर केला होता. त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तो संमत केल्यानंतर त्या देशाच्या प्रशासनाने त्याचे प्रत्यार्पण भारताला करण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी ताब्यात
मंगळवारी त्याला रवांडाकडून सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्वरित त्याला भारताना आणण्यात आले असू त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. 3 वर्षांपूर्वी त्याच्या टोळीचा विध्वंस करण्यात आल्यानंतर त्याने भारतातून पलायन केले होते. त्यानंतर त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते.
17 आरोपींचे प्रत्यार्पण
सलमान खान हा सतरावा प्रत्यार्पित आरोपी आहे. 2020 पासून भारताने 17 कुख्यात गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करुन घेण्यात यश मिळविले आहे. गेल्या महिन्यात बलजीत सिंग नामक खलिस्तानी दहशतवाद्याचे प्रत्यार्पण संयुक्त अरब अमिरातीकडून करण्यात आले आहे. त्यापूर्वीच्या महिन्यात रेहान अराबिकालालारीकाला या केरळ सरकारला हव्या असणाऱ्या गुन्हेगाराचे प्रत्यार्पण करुन घेण्यातही सीबीआयला यश आले होते. याशिवाय सीबीआयने 2021 पासून आतापर्यंत 100 अन्य गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करुन घेण्यातही महत्वाची भूमिका साकारली आहे, अशी माहिती सीबीआयच्या वतीने देण्यात आली आहे.