रमेशभाईला रौप्य, ऐश्वर्या, सामराची निराशा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि सिफ्त कौर सामरा यांच्याकडून साफ निराशा झाली. पण पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात स्मित रमेशभाई मोरडीयाने रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेत सोमवारी भारताला एकमेव पदक रमेशभाईकडून मिळाले. भारताच्या ऑलिम्पिक नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरला महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर सामराला महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन प्रकारात चौथे स्थान मिळाले. गुजरातचा नेमबाज रमेशभाई मोरडीयाने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत रौप्य पदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात झेकच्या जिरी प्रिवरात्स्कीने 252.2 गुणांसह सुवर्णपदक घेतले. तर मोरडीयाने 252.1 गुण नोंदवित दुसरे स्थान मिळविले. मोरडीयाचे सुवर्णपदक केवळ 0.1 गुणाने हुकले. झेकच्या प्रिवरात्स्कीने पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात रविवारी सुवर्णपदक मिळविले होते. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेमध्ये 23 देशांचे सुमारे 220 नेमबाज सहभागी झाले आहेत.