रशियाच्या सैन्याचा आणखी एका शहरावर कब्जा
अमेरिकेची मदत न मिळाल्याने युक्रेन हवालदिन
वृत्तसंस्था / कीव्ह
रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी युरोपपासून अमेरिकेपर्यंत मंथन सुरू आहे. दुसरीकडे रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले केले जात आहेत. अमेरिकेकडून सर्वप्रकारची सैन्य मदत रोखण्यात आल्याने युक्रेन युद्धभूमीवर दुबळा पडला आहे. रशियन सैन्य या स्थितीचा लाभ घेत युक्रेनच्या शहरांवर कब्जा करत आहे. रशियाने स्वत:च्या कुर्स्क शहरातील एका हिस्स्यासोबत युक्रेनच्या एका शहरावर कब्जा केल्याचा दावा रविवारी केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांना तुम्ही पुतीन यांच्याकडून पराभूत होत आहात असे सुनावले होते. या पार्श्वभूमीवर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनच्या शहरावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन फार काळ रशियाला सामोरा जाऊ शकणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
युक्रेनच्या सुमी क्षेत्रातील एका शहरावर कब्जा केल्याचा दावा रशियाने केला आहे. ही कारवाई सीमापार हल्ल्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे, तर रशियन सैनिक कुर्स्क क्षेत्रात युक्रेनच्या सैन्याशी लढत आहेत. सुमी क्षेत्रातील नोवेनके शहराला युक्रेनच्या तावडीतून मुक्त करविले असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. नोवेनके हे शहर कुर्स्क क्षेत्राच्या सीमेनजीक आहे.