गोव्यात रशियन सीरियल किलर
दहा युवतींचा खात्मा केल्याचा संशय : गोवा हादरून सोडणारा प्रकार : पोलिसही गेले चक्रावून , पोलिसांसमोर मोठे आव्हान
पेडणे /(प्रतिनिधी)
मोरजी आणि हरमल येथे दोन रशियन महिलांचा निर्दयीपणे गळा चिरून खून करणारा रशियन संशयित आलेक्सेई लिओनोव या पर्यटकाने आणखी 10 पेक्षा जास्त युवतींचा निर्घृण खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले असून सीरियल किलर महानंद नाईक याच्यानंतरचा हा गोव्यातील दुसरा क्रूर सीरियल किलर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रशियन महिला पर्यटकांचे खून केल्याप्रकरणी पोलिस चक्रावून गेले आहेत. त्यामुळे या खुनी व्यक्तीकडून वदवून घेऊन त्या दृष्टीने तपास करणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
संशयिताला 14 दिवसांची पोलिस कोठडी
दोन रशियन युवतींच्या खूनप्रकरणी लिओनोव याला मांद्रे पोलिसांनी अटक केल्यानंतर काल न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. संशयिताने आणखी काही युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना संपविले असल्याचा संशय असल्याने त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
लैंगिक अत्याचार करून नंतर खून
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने या दोन्ही रशियन महिलेवर अगोदर लैंगिक अत्याचार केले. नंतर दोरखंडाने बांधून सुरीने हल्ला केला. या महिला नग्न अवस्थेत त्यांच्या खोलीवर सापडल्यामुळे संशयित आरोपीची मानसिकता लक्षात येते.
संशयिताने नेमके किती खून केले ?
संशयिताने नेमके किती खून केले त्याची सविस्तर माहिती तो देत नाही, त्यामुळे प्रत्येकवेळी आपली तो जबानी बदलत असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. आणखी कुठे अन्य खून केले आहेत का याचा तपास करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला घेऊन मांद्रे पोलिस फिरत आहेत. मात्र प्रत्येकवेळी ठिकाण बदलत असल्याने किंवा संशयिताला त्या ठिकाणची आठवण येत नसल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पेडणे तालुका पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक, उपनिरीक्षक तसेच अन्य पोलिस कॉन्स्टेबल हे ज्या पद्धतीने संशयिताला विविध ठिकाणी चौकशीसाठी घेऊन जात आहेत, त्यावरून त्याने आणखी काही युवतींचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
हात मागे बांधून अनन्वित अत्याचार
संशयिताने रशियन महिला तसेच युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. प्रेमाच्या जाळ्यात सापडल्यानंतर हसत-खेळत पाठीमागून त्यांचे हात बांधणे आणि नंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे
पीडित रशियन महिलांच्या नावात साम्य
लिओनोव याने ‘एलिना’ नाव असलेल्या दोन रशियन महिलांचा त्या पूर्ण नग्नावस्थेत असताना गळा चिरून खून केल्याची घटना लक्षात आल्यानंतर मांद्रे पोलिस हादरले आहेत. त्याने अशा प्रकारे आणखी किती युवतींना संपविले, याचा तपास पोलिस करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या जबान्या घेत असतानाच तो प्रत्येकवेळी वेगळीच माहिती देत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. प्रत्येकवेळी वेगळीच माहिती संशयित देत असल्याने पोलिसही चक्रावून जात आहेत. त्यामुळे संशयिताने नेमके किती खून केले याचा आकडा निश्चित होत नाही.
लिओनोव याने गिरकरवाडा-हरमल येथे एका भाड्याच्या खोलीत वास्तव्य केलेल्या एलिना कासथोनोवा या 37 वर्षीय महिलेचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. त्यानंतर मधलावाडा-मोरजी येथेही त्याच पद्धतीने एलिना वनिवा या युवतीचा ती पूर्ण नग्न अवस्थेत असताना गळा चिरून खून केला. त्याने हे खून का केले, याविषयी पोलिस जबानी घेत आहेत.
मांद्रे पोलिसांसमोर मोठा पेच
विदेशी रशियन महिला पर्यटकांचे विदेशी रशियन पुऊष पर्यटकाने केलेले दोन खून आणि त्यानंतर मिळालेले मृतदेह यामुळे पेडणे तालुक्याबरोबरच गोव्याची जागतिक स्तरावर बदनामी होण्याची शक्यता आहे. गोव्याच्या पर्यटनालाही यामुळे ठेच पोचण्याची शक्यता आहे. शंशयिताने आणखी किती खून केले आणि त्यांचे मृतदेह कुठे ठेवले किंवा टाकले याबाबतही शोध घेण्याची मोठी जबाबदारी पोलिसांसमोर असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.