For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियन राष्ट्राध्यक्षांचे आज भारतात आगमन

06:55 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
रशियन राष्ट्राध्यक्षांचे  आज भारतात आगमन
Advertisement

दोन दिवसांचा दौरा : संरक्षण करारांना मिळणार बळ : दिल्लीत बहुस्तरीय सुरक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवार, 4 डिसेंबर रोजी भारतात आगमन होत आहे. ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. यादरम्यान मोठ्या संरक्षण करारांना मूर्त स्वरुप मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. आता या भेटीत संरक्षण करार अपेक्षित असून नवीन एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीसंबंधी निर्णय महत्त्वपूर्ण असेल. तसेच पुतिन यांच्या भेटीत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि व्यापार या विषयांवरील बैठका आणि करारांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन तीन वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांची यापूर्वीची भेट डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. आता 23 वी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद 4 आणि 5 डिसेंबर रोजी होणार असल्याने ते भारतात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यातील मैत्रीवर जगाचे लक्ष आहे. पुतिन यांच्या भेटीमुळे भारताचे हवाई संरक्षण आणखी मजबूत होईल. भारतात उत्पादित नवीन एस-400 सज्ज झाल्यानंतर स्वावलंबी भारताचे स्वप्न एक पाऊल जवळ येईल. या माध्यमातून भारताच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करू नका असा स्पष्ट संदेश पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शत्रूराष्ट्रांना दिला जाणार आहे.

वास्तव्य गुप्त ठिकाणी

पुतिन यांच्या दिल्ली भेटीची तयारी पूर्ण झाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी 5-7 थरांची सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशीय भारत दौऱ्यात पुतिन दिल्लीतील एका गुप्त ठिकाणी राहणार आहेत. त्यांच्या निवासाबद्दलची माहिती सार्वजनिक केलेली नाही. 4 आणि 5 डिसेंबर रोजी दिल्लीला बहुस्तरीय सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. भेटीदरम्यान त्यांचे वेळापत्रक आणि मार्ग गुप्त ठेवण्यात आले आहेत. वाहतूक पोलीस सतर्क असून आवश्यक असल्यास मार्गांमध्ये बदल केले जाऊ शकतात. राजधानीच्या बहुतेक भागात एटीएस टीम, दहशतवादविरोधी पथके आणि जलद कृती पथके तैनात केली जातील. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी रशियन सुरक्षा दल आणि प्रोटोकॉल टीमचे 50 हून अधिक कर्मचारी पंधरवड्यापूर्वी दिल्लीत दाखल झाले होते.

संरक्षण करार केद्रस्थानी

संरक्षण करार हे पुतिन यांच्या भेटीचा प्राथमिक केंद्रबिंदू आहे. रशियाने भारताला त्यांचे एसयु-57 स्टेल्थ लढाऊ विमाने, रशियाचे सर्वात प्रगत लढाऊ विमाने पुरवण्याची तयारी आधीच जाहीर केली आहे. भारत आधीच आपल्या हवाई दलाच्या ताफ्याला बळकट करण्यासाठी नवीन पर्यायांचा शोध घेत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पुढील आवृत्ती एस-500 वरील भविष्यातील सहकार्य आणि दोन्ही देशांच्या नौदलासाठी युद्धनौकांच्या संयुक्त निर्मितीवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारत रशियाकडून अतिरिक्त एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी चर्चा करू शकतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे चौथ्या स्क्वॉड्रनची डिलिव्हरी रखडली आहे. एस-400 ट्रायम्फ ही रशियाची प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली असून ती 2007 मध्ये लाँच करण्यात आली होती. ही प्रणाली लढाऊ विमाने, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रs, ड्रोन आणि अगदी स्टेल्थ विमाने देखील पाडू शकते. हे विविध हवाई धोक्यांविरुद्ध एक मजबूत ढाल म्हणून काम करते. ही जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते.

Advertisement
Tags :

.