रशियन नौदल उपप्रमुख युक्रेनच्या हल्ल्यात ठार
कुर्स्क येथे कमांड पोस्टवर हल्ला
वृत्तसंस्था/मॉस्को
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान एक मोठी घटना समोर आली आहे. रशियन नौदलाचे उपप्रमुख मेजर जनरल मिखाईल गुडकोव्ह यांचा युक्रेनने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कुर्स्क प्रदेशातील कमांड पोस्टवर झालेल्या हल्ल्यात गुडकोव्ह यांचा मृत्यू झाल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ते युक्रेनविरुद्धच्या युद्धात सक्रिय असलेल्या ब्रिगेडचे नेतृत्व करत होते. रशियन सुरक्षा यंत्रणांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. रशियन लष्करी आस्थापनेत या मृत्यूकडे गांभीर्याने पाहिले जात असून अंतर्गत सुरक्षा उपाययोजना कडक केल्या जात आहेत.
युक्रेनच्या सीमेवरील कुर्स्क प्रदेशातील कोरेनेव्हो येथे असलेल्या कमांड पोस्टला युक्रेनियन सैन्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यासह अनेक सैनिक मारले गेल्याचे वृत्त पसरल्यानंतर काही काळाने नौदल उपप्रमुखांचे नाव जाहीर करण्यात आले. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील प्रदेशाचे गव्हर्नर ओलेग कोझेम्याको यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. मेजर जनरल गुडकोव्ह हे अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना मारले गेले. त्यांच्यासह इतर 10 रशियन सैनिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे कोझेम्याको म्हणाले.
रशियाचे मोठे लष्करी नुकसान
गुडकोव्ह यांच्या मृत्यूला रशियाच्या लष्करी कमांडसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनियन हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्वात वरिष्ठ रशियन लष्करी अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. ते केवळ सागरी ऑपरेशन्समध्ये तज्ञ नव्हते, तर युक्रेनविरुद्ध रशियन जमिनीवरील ऑपरेशन्समध्ये सक्रिय भूमिका बजावतानाही दिसले. त्यांची धोरणात्मक क्षमता आणि कमांड शैली रशियन सैन्यात प्रभावी मानली जात होती.