रशियन कच्च्या तेलाची खरेदी महागणार
रशियन तेल कंपनीचा भारताला दणका : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ शक्य,बीपीसीएल, एचपीसीएल कंपन्यांशी करार अपूर्ण,‘आयओसी’सोबतच्या कराराने भारताला दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास नकार दिला आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) या भारतातील दोन सरकारी कंपन्यांची तेलखरेदीबाबत रशियन कंपनी रोसनेफ्टशी अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा फिसकटल्यामुळे कच्चे तेल आता अनुदानित दरात उपलब्ध होणार नाही. याशिवाय कच्च्या तेलाची किंमत 13 आठवडय़ांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे नजिकच्या काळात देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होतो. गुरुवारी कच्चे तेल 124 डॉलर प्रतिबॅरलच्या जवळ पोहोचले. ही गेल्या 13 आठवडय़ातील सर्वात उच्चांकी पातळी आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होणार असून, वाढता तोटा कमी करण्यासाठी त्याचा बोजा देशातील जनतेवर टाकला जाऊ शकतो. भारताला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळाले नाही, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणे जवळपास निश्चित आहे.
आयओसीसोबत 6 महिन्यांचा करार
स्वस्त कच्च्या तेलासाठी आतापर्यंत केवळ इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) रशियन कंपनीशी 6 महिन्यांचा करार केला आहे. या करारानुसार इंडियन ऑईल दर महिन्याला रशियन तेल कंपनीकडून 6 दशलक्ष बॅरल तेल खरेदी करू शकते. यासोबतच 30 लाख बॅरल अधिक तेल खरेदी करण्याचाही पर्याय आहे.
रशियाने युपेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक युरोपीय देशांनी रशियन तेलावर बंदी घातली होती. दरम्यान, भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत होता. दोन भारतीय सरकारी तेल कंपन्यांची तेल खरेदी करण्यासाठी रशियाशी चर्चा सुरू होती. मात्र, आता रशियन तेल कंपनीने संबंधित बोलणी यथास्थित ठेवली आहेत. रशियन तेल कंपनी रोसनेफ्टने इतर ग्राहकांना तेल पुरवण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. रशियन कंपनीसोबतचा हा पुरवठा करार न झाल्यास भारतीय कंपन्यांना स्पॉट मार्केटमधून अधिक महाग तेल खरेदी करावे लागू शकते.