रशिया-युक्रेन चर्चा केवळ तासभर
शांतता चर्चेची दुसरी फेरी : युक्रेनियन शिष्टमंडळ लष्करी गणवेशात उपस्थित
वृत्तसंस्था/ इस्तंबूल
रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्तंबूलमध्ये केवळ तासाभरात संपली. युक्रेनने रशियातील सायबेरियात मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केल्यानंतर ही चर्चा झाली असून बैठकीदरम्यान रशियन शिष्टमंडळाने उद्याची वाट पहा असा सूचक इशारा दिल्याचे समजते. यापूर्वी, 16 मे रोजी दोन्ही देशांचे शिष्टमंडळ इस्तंबूलमध्ये भेटले होते. पहिल्या फेरीमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाने दोन तास चर्चा केली होती.
रशिया आणि युक्रेनमधील शस्त्रसंधीबाबत सध्या एकीकडे चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन हल्ले सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही प्रकारे दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, रशिया आणि युक्रेनचे शिष्टमंडळ सोमवारी दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा थेट शांतता चर्चेसाठी तुर्कीमध्ये जमले होते. युक्रेनचे शिष्टमंडळ चर्चेसाठी लष्करी गणवेशात आले होते. युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तेम उमरोव आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे जवळचे सहकारी व्लादिमीर मेंडिन्स्की यांनी या संभाषणात भाग घेतला. तथापि, या बैठकीतून कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही.
एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात रशियाला खूप नुकसान झाले आहे, त्यानंतर रशियानेही प्रत्युत्तर म्हणून युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले वाढवले आहेत. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात देशभरातील 5 लष्करी हवाई तळांना लक्ष्य केल्यामुळे अनेक विमानांचे नुकसान झाल्याची कबुली रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. तथापि, नुकसान झालेल्या विमानांची नेमकी संख्या देण्यात आलेली नाही. युक्रेनने मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशातील विमानतळांवर एफपीव्ही (फर्स्ट पर्सन व्ह्यू) ड्रोनने दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप रशियन संरक्षण मंत्रालयाने केला. मात्र, इवानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशातील लष्करी हवाई तळांवर केलेले सर्व दहशतवादी हल्ले उधळून लावण्यात आले.
पहिल्या चर्चेतील मुद्दे...
कैद्यांची देवाण-घेवाण : 16 मे रोजी इस्तंबूलमध्ये रशियन आणि युक्रेनियन शिष्टमंडळांमध्ये झालेल्या चर्चेनंतर, दोन्ही देशांनी प्रत्येकी 1,000 कैद्यांची देवाण-घेवाण करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर दोघांनीही कैद्यांना सोडले.
युद्धविराम : युक्रेनने 30 दिवसांच्या युद्धविरामाची मागणी केली होती, परंतु रशियाने ती मान्य केली नाही. युक्रेनने डोनेत्स्क, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन या चार प्रदेशांमधून पूर्णपणे माघार घ्यावी, अशी रशियाने घातलेली अट युक्रेनने नाकारली होती.
प्रदेशांवर नियंत्रण : दोन्ही देशांमध्ये सुरक्षा हमी आणि निर्बंधांवर चर्चा झाली, परंतु एकमत झाले नाही. रशियाने क्रिमिया आणि इतर व्यापलेल्या प्रदेशांवर नियंत्रणाची मागणी केली, तर युक्रेनने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा आग्रह धरला.