रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला
14 जणांचा मृत्यू : शांतता करारावरील चर्चेदरम्यान रक्तपात, बहुमजली इमारती लक्ष्य
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया-युक्रेनमधील संघर्षासंबंधी शांतता करारांवर सर्वसाधारण चर्चा सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. डोब्रोपिलिया या उत्तर युक्रेनियन शहरावर रशियन सैन्याने रात्री केलेल्या हल्ल्यात पाच मुलांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 37 जण जखमी झाले आहेत. रशियन सैन्य डोनेस्तक प्रदेशात वारंवार हल्ले करत असून डोनबास प्रदेश ताब्यात घेण्याची तयारी करत असल्याचे समजते.
रशियन सैन्याने शुक्रवारी रात्री बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs, अनेक रॉकेट आणि ड्रोनने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या ताज्या हल्ल्यामध्ये आठ बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्या. तसेच 30 वाहनांचेही नुकसान झाले. या दुर्घटनेत पाच मुलांसह 14 जण मुत्युमुखी पडले आहेत. तसेच खार्किव प्रदेशात झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही युक्रेनियन मंत्रालयाने म्हटले आहे.
झेलेन्स्की यांच्याकडून पुतीन टार्गेट
शांतता चर्चेदरम्यान रशियन हल्ल्यांबद्दल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांवरून रशियाचे उद्दिष्ट बदललेले दिसत नाही, अशी टिपण्णी त्यांनी फेसबुकवर केली आहे. आता जीवितहानी रोखण्यासाठी आणि आपले हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असेल असेही त्यांनी सांगितले. तसेच रशियाविरुद्ध निर्बंध वाढवण्याचा इशारा देतानाच पुतीन यांना युद्धासाठी आर्थिक मदत करणारी प्रत्येक गोष्ट संपवली जाईल, असेही ते म्हणाले.
रशियासोबत शांतता करार करणे सोपे, युक्रेनकडे पर्याय नाही : ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. युक्रेनपेक्षा रशियासोबत शांतता करार करणे सोपे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. पुतीन युद्ध संपवू इच्छितात. मात्र, युक्रेनशी व्यवहार करणे आपल्यासाठी अधिक कठीण होत चालले आहे. त्यांच्याकडे जास्त पर्याय नाहीत, असे ट्रम्प पुढे म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काम करण्याबद्दल सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना भेटण्यासाठी अमेरिका दौरा केला होता. तथापि, ओव्हल ऑफिसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात तणाव निर्माण झाल्यापासून दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला दिसत आहे.