रशियाचा युक्रेनवर ‘हायपरसोनिक’ हल्ला
‘ओरेश्निक’ क्षेपणास्त्राचा दुसऱ्यांदा वापर : पोलंडजवळील शहर टार्गेट
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिकाधिक गंभीर होत चालले असून ते संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. नव्या संघर्षादरम्यान रशियाने युक्रेनवर प्राणघातक क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. रशियाने आपल्या ओरेश्निक क्षेपणास्त्राने युक्रेनला लक्ष्य करताना पोलंडजवळील शहराला लक्ष्य केल्याचे समजते. हा हल्ला 8-9 जानेवारी 2026 च्या रात्री झाला असून त्यामध्ये 242 ड्रोन आणि 36 क्षेपणास्त्रांचा समावेश होता, ज्यामध्ये ओरेश्निक या ‘सुपरसोनिक’ क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याचे रशियानेच जाहीर केले आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ‘सुपरसोनिक’ क्षेपणास्त्र हल्ल्याविषयीची घोषणा केली. या हल्ल्यासाठी रशियाने युक्रेनविरुद्ध त्यांचे नवीन इंटरमीडिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र - ‘ओरेश्निक’चा वापर केला आहे. युद्धात या क्षेपणास्त्राचा दुसऱ्यांदा वापर झाला आहे. यापूर्वी पहिला हल्ला नोव्हेंबर 2024 मध्ये डनिप्रो शहरावर करण्यात आला होता.
गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2025 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बदला म्हणून हा ‘सुपरसोनिक’ हल्ला करण्यात आला. युक्रेनने नोव्हगोरोड प्रदेशातील पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा रशियाने केला होता. तथापि, युक्रेनने याचा इन्कार केला होता. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही असा कोणताही हल्ला झाला नसल्याचे म्हटले होते.
हायपरसोनिक क्षेपणास्त्र अत्यंत प्राणघातक
‘ओरेश्निक’ क्षेपणास्त्र हे रशियाच्या सर्वात प्राणघातक हायपरसोनिक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. ध्वनीच्या वेगापेक्षा 10 पट वेगाने प्रवास करणारे हे क्षेपणास्त्र रोखणे जवळजवळ अशक्य आहे. त्याची मारक क्षमता 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या क्षेपणास्त्राद्वारे रशिया संपूर्ण युरोपला लक्ष्य करू शकतो. हे क्षेपणास्त्र इतके घातक आहे की ते मोठ्या भागात विनाश घडवू शकते.
युक्रेनियन शहर ताब्यात
रशियन सैन्याने आणखी एक युक्रेनियन शहर ल्विव्ह ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याच्या काही काळापूर्वीच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. झेलेन्स्की यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ जारी केला. रशियाने युक्रेनची राजधानी कीववरही हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये किमान तीन लोक ठार झाले आणि 16 जण जखमी झाले. रशियाने पश्चिमेकडील ल्विव्ह शहरावरही क्षेपणास्त्रs डागली.