For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कीव्हजवळ रशियन ड्रोन हल्ल्यानंतर भीषण स्फोट; ३७ जणांचा मृत्यू;आगीच्या भिंतीने परिसरात हाहाकार

01:20 PM Aug 30, 2026 IST | YOGESH KANGUDE
कीव्हजवळ रशियन ड्रोन हल्ल्यानंतर भीषण स्फोट  ३७ जणांचा मृत्यू आगीच्या भिंतीने परिसरात हाहाकार
Advertisement

कीव्ह : युक्रेनची राजधानी कीव्हच्या पश्चिमेला असलेल्या मायला परिसरात रशियन ड्रोन हल्ल्यानंतर भीषण स्फोटांची मालिका घडल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाला असून अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, रशियन ड्रोनने कथितरित्या दारूगोळा साठवणूक केंद्राला लक्ष्य केले. त्यानंतर मोठे स्फोट झाले आणि परिसरात भीषण आग पसरली. स्फोटांच्या आवाजाने आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर हादरला.

हल्ल्यातून बचावलेल्या एका स्थानिक महिलेने आपला थरारक अनुभव सांगताना घराच्या दिशेने ‘आगीची भिंत’ वेगाने येत असल्याचे सांगितले. जीव वाचवण्यासाठी तिने जमिनीवरून रांगत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शेजारील गावाचे प्रमुखही ठार झाले. बचावकार्यात मदत करण्यासाठी ते घटनास्थळी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

Advertisement

स्फोटांमुळे परिसरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ उठले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून विस्थापित नागरिकांनी तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये आश्रय घेतला आहे.

हल्ल्यानंतर युक्रेनमधील स्थानिक समुदायांमध्ये शोककळा पसरली आहे. नागरिक मृतांच्या आठवणींना उजाळा देत असताना बचाव पथकांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, या हल्ल्यामुळे रशिया-युक्रेन युद्धातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बचावकार्य आणि नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.

Advertisement
Tags :

.