रशियाकडून आण्विक क्षेपणास्त्र डागण्याचा सराव
राष्ट्रपती पुतीन यांनी केले निरीक्षण / वृत्तसंस्था
मॉस्को
युक्रेनसोबत रशियाचे युद्ध सुमारे 2 वर्षांपासून जारी आहे. याचदरम्यान रशियाने स्वत:च्या आण्विक युनिटचे प्रात्यक्षिक केले आहे. यात बॉम्ब, बॅलेस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्रांना अचूकपणे डागण्यात आले आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी क्रेमलिनमध्ये असलेल्या आण्विक सेंटरमधून या प्रात्यक्षिकाचे निरीक्षण केले आहे.
आज आम्ही रणनीतिक प्रतिबंधक युनिटचा सराव करत आहोत. यात अण्वस्त्रांच्या वापरासंबंधी सराव केला जाणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. रशिया अण्वस्त्रांचा वार केवळ अंतिम उपायाच्या स्वरुपात करणार आहे. अण्वस्त्रांचा वापर हा केवळ देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक असेल तरच करण्याचे तत्व रशियाच्या सैन्य धोरणात असल्याचे उद्गार पुतीन यांनी यावेळी काढले आहेत.
आण्विक शक्ती हीच सार्वभौमत्वाची हीम
न्युक्लियर ट्रायड आमच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेची मजबूत हमी आहे. ही शक्ती आम्हाला जागतिक शक्तींसोबत संतुलन राखण्यास मदत करते. सद्यकाळात वाढता जागतिक तणाव आणि बाहेरील धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक रणनीतिक प्रतिबंधक युनिट्सना नेहमी तत्पर ठेवणे आवश्यक आहे. त्यांना सातत्याने अपडेड करणे महत्त्वपूर्ण ठरल्याचे पुतीन यांनी नमूद केले आहे. रशिया स्वत:च्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या सर्व हिस्स्यांना मजबूत करणे जारी ठेवणार आहे. आमच्या रक्षणासाठी आमच्याकडे पुरेसे स्रोत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आण्विक क्षमतेत सातत्याने वाढ
रशिया स्वत:च्या युद्धसामग्री नियोजनात सातत्याने बदल करत आहे. आगामी काळात रशियाच्या स्ट्रॅटेजिक मिसाइल फोर्सेस ऑफ रशियन फेडरेशनला नव्या स्थिर आणि मोबाइल मिसाइल प्रणालींमध्ये बदलण्यात येणार आहे. त्याची अचूकता अधिक असेल, प्रक्षेपणासाठी तयारीचा कालावधी कमी असेल आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेला चकवा देण्याची क्षमता यात जोडली जाणार आहे. रशियाच्या नौदलाच्या ताफ्याला अत्याधुनिक आण्विक पाणबुड्यांद्वारे अद्ययावत केले जात आहे. तसेच वायुदलात दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बार्डियर विमानांचे देखील आधुनिकीकरण केले जात आहे.