रशिया-चीन संबंध अधिक बळकट
युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेला सहकार्य करणार
► वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या बहुचर्चित चीन भेटीनंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही चीनचा दौरा केला आहे. या दौऱ्यामुळे रशिया आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले असले, तरी दोन्ही देशांमध्ये मोठे आर्थिक किंवा ऊर्जेसंबंधीचे करार झालेले नसल्याचे दिसून येत आहे. तथापि, आर्थिक सहकार्याचे 21 करार केल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, मध्यपूर्वेत होत असलेले अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची आवश्यकता असून त्यासाठी अमेरिकेला सहकार्य करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
ट्रंप यांचा चीन दौरा संपल्यानंतर त्वरित पुतीन यांनी चीनला भेट दिल्याने तो आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. रशिया आणि चीन यांच्यात इंधन वायू पाईपलाईन टाकण्यासंबंधीची चर्चा अनेक वर्षांपासून होत आहे. पुतीन यांच्या या दौऱ्यात यासंबंधी करार होऊ शकतो, अशी प्रथम चर्चा होती. तथापि, रशिया आणि चीन यांच्या संयुक्त निवेदनात अशा कोणत्याही कराराचा उल्लेख नव्हता. तसेच दोन्ही देशांमध्ये मोठे आर्थिक करारही झाले नसल्याचे स्पष्ट केले जात आहे.
शिखर परिषद समाप्त
बुधवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पुतीन यांच्यासाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची शिखर परिषदही पार पडली. द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त नंतर देण्यात आले. पण नेमके कोणते निर्णय झाले, यांच्या संदर्भात काहीही स्पष्टपणे घोषित करण्यात आले नाही. ट्रंप यांच्या चीन दौऱ्यातही अमेरिका आणि चीन यांच्यात कोणत्याही मोठ्या करारांची घोषणा करण्यात आली नव्हती. पुतीन यांचा चीन दौराही अशाच प्रकारे झाल्याचे दिसत आहे. काही गुप्त निर्णय झाले असणे शक्य आहे, अशीही चर्चा केली जात आहे. सध्या जगात ‘जंगलराज’ निर्माण झाले असल्याचे सूचक वक्तव्य जिनपिंग यांनी केले आहे. मात्र, त्यावर त्यांनी अधिक स्पष्टीकरण न केल्याने ते नेमके कोणाला उद्देशून आहे, यावर राजकीय विश्लेषकांमध्ये विविध मतमतांतरे दिसून येत आहेत.
पंचवीसावा चीन दौरा
व्लादिमीर पुतीन यांचा हा 25 वा चीन दौरा होता. क्षी जिनपिंग हे चीनचे सर्वेसर्वा झाल्यापासून, म्हणजे 2013 पासूनचा हा पुतीन यांचा 13 वा चीन दौरा होता. 2000 पासून पुतीन सातत्याने चीनचा दौरा करीत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी जवळपास प्रत्येक वर्षी चीनचा दौरा केला आहे. जिनपिंग यांनीही रशियाचे अनेक दौरे केले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुदृढ आर्थिक संबंध आहेत.
एपेक परिषदेलाही येणार
येत्या नोव्हेंबरमध्ये चीनने ‘एपेक’ (एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन समिट) परिषदेचे आयोजन केले आहे. व्लादिमीर पुतीन या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. क्षी जिनपिंग यांनी रीतसर या परिषदेचे आमंत्रण पुतीन यांना दिले आहे. त्यामुळे 2026 मध्ये पुतीन दोन वेळा चीनचा दौरा करणार हे स्पष्ट आहे.
दोन्ही देशांचे संयुक्त निवेदन
पुतीन यांचा चीन दौरा संपत असताना दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध पेले आहे. जगाच्या सध्याच्या परिस्थितीत बहुकेंद्री विश्व व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. रशिया आणि चीन यांच्यात अमर्याद आर्थिक आणि सामरिक सहकार्य विकसीत केले जाईल, तसेच जागतिक शांततेसाठी दोन्ही देश मिळून कार्य करतील. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय समस्या आणि संघर्षांवर चर्चा आणि सहकार्याच्या माध्यमातून शांततामय मार्गाने तोडगा निघेल, असे अनेक मुद्दे या निवेदनात दिले गेले आहेत.
वाढले चीनचे महत्व
ड डोनाल्ड ट्रंप आणि व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्यांमुळे चीनचे वाढले महत्व
ड जागतिक संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी रशिया-चीन एकत्र काम करणार
ड आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांशी अधिक सहकार्य करणार