युक्रेनमधील भारतीय औषध गोदामावर रशियाचा हल्ला
राजदुतांचा दावा : जाणूनबुजून हल्ला केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कीव
युक्रेनवर झालेल्या रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात कुसुम या भारतीय औषध कंपनीच्या गोदामाला आग लागली. हल्ला करण्यात आलेल्या गोदामात वृद्ध आणि मुलांसाठीची आवश्यक औषधे होती. या हल्ल्यानंतर भारतातील युक्रेनियन दूतावासाने राजधानी कीवमधील भारतीय गोदामाला जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा आरोप रशियावर केला. तथापि, भारत आणि रशियाने याबाबत अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.
युक्रेनियन नागरिकांविरुद्ध रशियाची दहशतवादी मोहीम सुरूच आहे. रशियाने शनिवारी रात्री युक्रेनमधील भारतीय कंपनी ‘कुसुम’च्या गोदामावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. भारताशी विशेष मैत्री असल्याचा दावा करणारा रशिया जाणूनबुजून भारतीय कंपन्यांवर हल्ला करत आहे, असे युक्रेनच्या भारतातील राजदुतांनी रविवारी सांगितले. तसेच युक्रेनचे ब्रिटनमधील राजदूत मार्टिन हॅरिस यांनीही असा रशियन हल्ल्यांमुळे राजधानी कीवमधील एका प्रमुख औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. तथापि, हा हल्ला क्षेपणास्त्रांनी नव्हे तर रशियन ड्रोनद्वारे करण्यात आला, असे मार्टिन म्हणाले.
दोन आठवड्यांपूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये एक करार झाला होता. या करारात दोन्ही देशांनी एकमेकांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच काळ्या समुद्रात जहाजांची सुरक्षित हालचाल सुरू राहील. यासोबतच आम्ही कायमस्वरूपी शांततेसाठी प्रयत्न करू, असेही स्पष्ट केले होते. अमेरिकेने याबाबत युक्रेन आणि रशियासोबत वेगळे करार केले आहेत. गेल्या महिन्यात अमेरिका आणि रशियाने सौदी अरेबियातील रियाध येथे 12 तासांहून अधिक काळ बैठक केली होती.
युक्रेनचा 20 टक्के भाग रशियाच्या नियंत्रणाखाली
गेल्या तीन वर्षांत रशियाने युक्रेनचा जवळपास 20 टक्के भाग ताब्यात घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनचे डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसन हे चार पूर्वेकडील प्रांत रशियाला जोडले आहेत. तर रशियाच्या कुर्स्क प्रदेशात दोन्ही सैन्यांमधील संघर्ष सुरूच आहे.