रशिया-युक्रेनकडून युद्धविरामाची घोषणा
रशिया पहिल्यांदाच शस्त्रास्त्रांशिवाय विजय दिन साजरा करणार
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया आणि युक्रेनने 9 मे रोजीच्या विजय दिनापूर्वी वेगवेगळ्या कालावधीकरता युद्धविरामाची घोषणा केली आहे. रशियाने शुक्रवार आणि शनिवारसाठी युद्धविराम घोषित केला. तर युक्रेनने बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून युद्ध रोखणार असल्याचे सांगितले आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या पराभवाच्या 81 व्या वर्षानिमित्त रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. परंतु युक्रेनने सोहळ्यात अडथळे आणल्यास कीव्हवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात येईल असा इशारा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिला आहे.
आमचा देश बुधवार रात्रीपासून युद्धविराम मानणार आहे, परंतु रशियाच्या प्रत्येक कारवाईला प्रत्युत्तरही देईल असे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे, परंतु त्यांनी युद्धविरामाची कुठलीच निश्चित कालमर्यादा सांगितलेली नाही. मॉस्कोच्या लाल चौकात होणारे विजय दिन संचलन देखील यावेळी वेगळ्या पद्धतीने होणार आहे. संभाव्य ड्रोन हल्ल्यांचा धोका पाहता रणगाडे आणि मोठी शस्त्रास्त्रs यात सामील होणार नाहीत. सुमारे 2 दशकांमध्ये पहिल्यांदाच मॉस्कोतील संचलन अवजड शस्त्रास्त्रांशिवाय होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक शहरांमध्ये संचलन मर्यादित किंवा रद्द करण्यात येत आहे. रशियासाठी विजय दिन अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिनाला राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे देशाचे सामर्थ्य आणि देशभक्तीशी जोडत असतात.