For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रसेलची हॅट्ट्रिक, एचआयएल जीसीचा एसजी पायपर्सवर 3-2 विजय

06:55 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
रसेलची हॅट्ट्रिक  एचआयएल जीसीचा एसजी पायपर्सवर 3 2  विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

न्यूझीलंडचा खेळाडू केन रसेलने उशिरा केलेल्या पेनल्टी कॉर्नरवरील गोलसह हॅट्ट्रिक साधून येथे झालेल्या पुऊष हॉकी इंडिया लीगच्या रोमांचक सामन्यात एचआयएल जीसीला एसजी पायपर्सवर 3-2 असा विजय मिळवून दिला.

रसेलने तीन गोल (35 व्या, 37 व्या आणि 60 व्या मिनिटाला) केले आणि स्पर्धेतील एचआयएल जीसीचा पहिला सामना शेवटच्या क्षणी आपल्या बाजूने झुकवला. पायपर्सकडून काय विलॉट (31 व्या मिनिटाला) आणि दिलराज सिंग (56 व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. एसजी पायपर्सने वेगवान पासिंग आणि सुऊवातीच्या आक्रमक चालींचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणत सामन्याची जोरदार सुऊवात केली. त्यांना चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु ते या संधीचा फायदा उठवू शकले नाहीत.

Advertisement

एचआयएल जीसीने हळूहळू सामन्यातील आपले स्थान पक्के केले आणि दबाव कमी करण्यासाठी स्वत:च्या काही आक्रमक चालींनी प्रत्युत्तर दिले. पहिल्या सत्रात पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना त्यांना एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण तो गोलमध्ये रूपांतरित होऊ शकला नाही. या सत्रामधील सर्वांत जवळची संधी शेवटच्या क्षणी आली, जेव्हा एचआयएल जीसीने गोल करून बरोबरीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु पायपर्सचा गोलरक्षक थॉमस सांतियागोने जवळून बचाव करून पहिले सत्र गोलशून्य अवस्थेत संपेल याची खात्री केली.

दुसरे सत्र दोन्ही बाजूंनी जोरदार खेळाने सुरू झाले, ज्यात एसजी पायपर्स आणि एचआयएल जीसी या दोन्ही संघांनी खेळाची तीव्रता वाढवली आणि वारंवार प्रतिस्पर्ध्यांच्या डी क्षेत्रामध्ये प्रवेश केला. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या आणि सतत दबाव ठेवला, ज्यामुळे बचावफळी आणि गोलरक्षकांना सक्रिय राहावे लागले. दोन्ही बाजूंनी काही जवळच्या संधी मिळाल्या असूनही कोणताही संघ निर्णायक फटका मारू शकला नाही.

बरोबरची कोंडी फोडण्याच्या निर्धाराने एसजी पायपर्सने नव्या जोमाने तिसऱ्या सत्रामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या या दृष्टिकोनाचे लवकरच फळ मिळाले. मध्यफळीतील खेळाडू काय विलॉटने (31 वे मिनिट) डी क्षेत्रात उत्तम संयम दाखवला, त्याने पास स्वीकारला, गोलच्या दिशेने आगेकूच केली आणि एचआयएल जीसीचा गोलरक्षक जेम्स माझारेलोच्या डोक्यावरून चेंडू हळुवारपणे जाळ्यात टाकून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र हा फायदा फार काळ टिकला नाही, कारण एचआयएल जीसीने ड्रॅग फ्लिक तज्ञ केन रसेलच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. रसेलने 35 व्या व 37 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर सलग दोन गोल करून सामन्याची दिशा आपल्या संघाच्या बाजूने वळवली. त्यानंतर कोणताही गोल न झाल्याने तिसरे सत्र एचआयएल जीसीकडे 2-1 अशी आघाडी राहून संपले.

एसजी पायपर्सने चौथ्या सत्राची सुऊवात आक्रमकपणे केली आणि अनेकदा प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात प्रवेश केला, परंतु अंतिम टप्प्यात त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही. मात्र सामना संपायला पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना पायपर्सने पुनरागमन केले. दिलराज सिंगने 56 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. मात्र हा दिलासा क्षणिक ठरला, कारण एचआयएल जीसीने शेवटच्या काही सेकंदांत पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि रसेलने 60 व्या मिनिटाला कोणतीही चूक न करता आपली हॅटट्रिक पूर्ण करत संघाला 3-2 असा नाट्यामय विजय मिळवून दिला.

Advertisement
Tags :

.