बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड
खरेदीसाठी परराज्यातील नागरिकही दाखल : गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून प्रयत्न आवश्यक
बेळगाव
गर्दीच गर्दी चोहीकडे
वाट शोधायची कुणीकडे...
असेच चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे. दिवाळीचा सण आणि खरेदीसाठी झालेली गर्दी यामुळे दररोज प्रत्येकालाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वर्षागणिक बेळगावमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे. हे गाव सीमेलगत असल्याने चंदगड आणि गोवा या भागातूनही खरेदीसाठी लोक येत आहेत. हाच सण हातात चार पैसे मिळविण्याची संधी देतो. त्यामुळे अलीकडे वेगवेगळे साहित्य घेऊन विक्रेतेही बेळगावला लहान-मोठ्या स्वरुपात व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी शहरातील गर्दी वाढतच चालली आहे. बाजारपेठेत काय नाही? हाच प्रश्न आता उरला आहे. तुम्हाला जे हवे, ते आमच्याकडे आहे, अशीच विक्रेत्यांची मानसिकता आहे. त्यामुळे म्हणतात ना, ‘पिन टू पियानो’ यानुसार बाजारपेठ सज्ज आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकही तत्पर आहेत. बाजारपेठेमध्ये होणारी आर्थिक उलाढाल हे खरे तर सुचिन्हच म्हणावे लागेल. प्रश्न आहे तो फक्त गर्दीचे नियंत्रण करण्याचा. त्याबाबत योग्य नियंत्रण करता आले तर काहीअंशी तरी ही कोंडी कमी होऊ शकते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.